हिंदी भाषेचा गोडवा काही वेगळाच आहे. विशेषकरून हिंदी काव्यमैफली ऐकताना तो जास्तच जाणवतो. त्यातच हास्य कविसंमेलन म्हटले तर मनावरचा सगळा ताण तर हलका होतोच, शिवाय समकालीन परिस्थितीवरचे ते चपखल असे भाष्य असते. हिंदी हास्य कविसंमेलनांचा फड गाजवणारे कवी प्रदीप चौबे यांना चाहत्यांचे प्रेम लाभलेले होते. आपल्या जीवनातील वेदना बाजूला ठेवून लोकांना हसवणे हे तसे फार अवघड काम असते, पण ती कला त्यांना लीलया साधली होती. हास्याचे गॅस सिलेंडर म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या काव्यमैफलीत नेहमीच हास्याची कारंजी उडत असत.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात त्यांचे सध्या वास्तव्य होते. त्यांना हास्यकवितांची देणगी त्यांचे मोठे बंधू दिवंगत शैल चतुर्वेदी यांच्याकडून वारशानेच मिळाली असे म्हणायला हरकत नाही. प्रदीप चौबे हे केवळ हास्यकवीच नव्हते तर उत्तम गज़्ालकार व शायर होते. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४९ रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे झाला. नागपूर येथून ते पदवीधर झाले होते. ‘बहुत प्यासा है पानी’, ‘खुदा गायब है’ (गज़्ाल संग्रह), ‘बाप रे बाप’ (हास्य-व्यंग्य कविता), ‘आलपिन’ (छोटी कविता), ‘चले जा रहे हैं’ (हास्य-व्यंग्य गज़्ालें) ही त्यांची ग्रंथसंपदा. ‘आरंभ-१’ (वार्षिकी), ‘आरंभ-२’ (गज़्ाल विशेषांक-१), ‘आरंभ-३’ (गज़्ाल विशेषांक), ‘आरंभ-४’ (गज़्ाल विशेषांक-२) या पुस्तकांची संपादने त्यांनी केली होती. त्यांच्या प्रशंसकांमध्ये ‘वजनदार कवी’ म्हणून परिचित असलेले चौबे अलीकडे कपिल शर्माच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कविता व गज़्ालांसाठी त्यांना काका हाथरसी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी हास्यकवितांना नेहमीच टीकात्मकतेची जोड देत समकालीन परिस्थितीवर उत्कट व व्यंगात्मक भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या कविता या काळाच्या प्रवाहात टिकून राहिल्या.
त्यांनी कवितांमधून रूढीवादी मानसिकतेला प्रभावीपणे लक्ष्य केले होते. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी अशीच धमाल उडवून दिली होती. फक्त माध्यम दूरचित्रवाणीचे होते इतकेच; पण त्यामुळे त्यांची प्रतिभा देशासमोर आणखी ठळकपणे सामोरी आली. त्यांच्या कवितेत नेहमीच देश, काल, वातावरण व समाज यांच्याशी नाळ जोडलेली असायची. जमशेदपूर, भोपाळ, लखनऊ, ग्वाल्हेर यांसारख्या ठिकाणी त्यांची हिंदी कविसंमेलनात नेहमी हजेरी असे. हसवण्याची त्यांची तऱ्हा निराळी व अजब होती. ते हास्यकवी असले तरी त्यांना त्यांचे गज़्ालकाराचे रूप जास्त पसंत होते. त्यांच्या गज़्ालांचे संकलनही करण्यात आले आहे. त्यांनी फेसबुकवरही त्यांच्या आलापिन या मंचाखालील छोटय़ा कवितांनी रसिकांचे तितकेच मनोरंजन केले. काल त्यांची निधनवार्ता आली आणि लोकांना हसवता हसवता ते सर्वाना रडवून गेले.