महिलांना हवाई दलात संधी मिळाल्यानंतर त्याचे त्यांनी सोनेच केले आहे. हीना जयस्वाल या तरुणीनेही भारतीय हवाई दलातील पहिली महिला हवाई अभियंता बनवण्याचा मान नुकताच पटकावला आहे. ती फ्लाइट लेफ्टनंट आहे. हवाई दलातील उड्डाण अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते, त्यात गुंतागुंतीच्या विमानप्रणालींचे संचलन करण्याचे कसब असावे लागते, त्यासाठी वचनबद्धता, समर्पण, परिश्रम लागतात. २०१८ मध्ये महिलांना उड्डाण अभियंता हे पद हवाई दलाने खुले केले, एरवी ते पुरुषांसाठीच होते. तिने येलहांका येथे सहा महिने प्रशिक्षण घेऊन इतर पुरुष सहकाऱ्यांच्या तोडीस तोड अभ्यास करून हे प्रावीण्य मिळवले. सियाचीन हिमनदी, अंदमान व निकोबार बेटे यांसह इतर अनेक आव्हानात्मक ठिकाणी प्रतिकूल हवामानात ती भारतीय हवाई दलाच्या विमानांमधील यंत्रणांचे संचलन करणार आहे.
हीनाचा जन्म चंदिगडचा, तिने पंजाब विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतून पदवी घेतली. संरक्षण खात्यातून निवृत्त झालेले मुख्य हिशेब तपासनीस डी. के. जयस्वाल व अनिता जयस्वाल यांची ती एकुलती कन्या. भारतीय हवाई दलाच्या अभियांत्रिकी विभागात ती ५ जानेवारी २०१५ पासून रुजू झाली. आधी बॅटरी कमांडर व फायरिंग टीमचे नेतृत्व केले. क्षेपणास्त्रांचा मारा करणाऱ्या विमानांचे संचलनही तिने केले. उड्डाण अभियंता म्हणून मान्यता मिळाल्यानंतर एक स्वप्नच पूर्ण झाले अशी स्वाभाविक प्रतिक्रिया तिने दिली आहे. बालपणापासूनच तिला सैनिकी गणवेश परिधान करण्याची आवड होती. त्यातूनच तिने अनेक आव्हाने लीलया पेलली. अलीकडच्या काळात संरक्षण दलातही लैंगिक समानता आणली जात असल्याने साहजिकच त्याचा योग्य तो लाभ हीनासारख्या मुलींनी घेतला आहे, १९९३ पासून भारतीय हवाई दलात महिला अधिकाऱ्यांना वैमानिक व इतर जबाबदाऱ्या कमिशन्ड अधिकारी म्हणून मिळण्यास पहिल्यांदा सुरुवात झाली. त्या प्रवासाचे अनेक टप्पे पार करीत आज महिला या हवाई दलात मोठी कामगिरी करीत आहेत, त्यात हीनाच्या यशाने आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हवाई दलाच्या महिला अधिकारी किरण शेखावत या २०१५ मध्ये गोव्यातील मोहिमेत डॉर्नियर अपघातात हुतात्मा झाल्या होत्या. कर्तव्य बजावत असताना त्यांचा झालेला मृत्यू चटका लावणारा होता. याचा अर्थ वेळप्रसंगी देशासाठी प्राणार्पण करण्यास महिलाही मागे नाहीत.