जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे, लेखन करणारे हिंदीतील मोठय़ा साहित्यिकांपैकी एक असलेले हिमांशू जोशी यांच्या निधनाने कुशल व प्रतिभाशाली साहित्यिक आपण गमावला आहे. सुमारे पाच दशके त्यांनी हिंदी साहित्यातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्या काळात त्यांनी समांतर साहित्य चळवळीशी नाते सांगताना समाजातील मागे पडलेल्या लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कथांमधून स्वातंत्र्योत्तर भारतातील नागरिकांच्या जीवनातील कल्पना व यथार्थता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा माणसाचे जीवन त्यांच्या कथांतून प्रकट होत असे. अंतत:, मनुष्यचिन्ह, गंधर्वगाथा हे कथासंग्रह, सुराज, समयसाक्षी या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. त्यांच्या अनेक पुस्तकांचे परदेशी भाषातून भाषांतर झाले आहे.
हिमांशू यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी उत्तरांचलमधील जोस्युदा गावातला. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या संस्कारांचा त्यांच्या बालमनावर मोठा प्रभाव पडला. हिमालयातील वातावरण, त्या भागातील गरिबी, अस्तित्वासाठी संघर्ष हे त्यांच्या लेखनाचे विषय ठरले नसते तरच नवल. प्राथमिक शिक्षणानंतर ते नैनितालला आले व तेथे अभ्यासाबरोबर कविता करू लागले. नंतर ते कथेकडे वळले, पण तरी कविता सुटली नाही. त्यांचा अग्निसंभव हा कवितासंग्रह खूप नंतर प्रकाशित झाला, कारण नंतरच्या काळात त्यांचे कवितेकडे दुर्लक्ष झाले. त्यांची पहिली कथा ‘बुझे दीप’ नवभारत टाइम्सच्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाली होती. कथा ही सामान्य माणसांशी जोडणारी असली पाहिजे या समांतर कथा चळवळीचे ते पाईक होते. प्रेमचंदही याच परंपरेतले.
बराच काळ त्यांनी साप्ताहिक हिंदुस्थानमध्ये पत्रकार व लेखक म्हणून काम केले. जेव्हा एकदा विचार सतत मनात येतो व बेचैन करतो त्यातून कहाणी कागदावर उतरत जाते असे ते सांगत असत. शरत साहित्यप्रेमी असलेल्या हिमांशू जोशी यांनी मनाची गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न करताना नेहमी माणसाला केंद्रस्थानी मानले. त्याग, तपश्चर्या, विस्थापन, परिवार, करुणा, संघर्ष, शोषण, स्नेह, वासना, तिरस्कार या सगळ्या भावनांचा रंगाविष्कार त्यांच्या कथातून दिसतो. त्यांच्या कादंबऱ्यांत अरण्य, महासागर, छाया मत छूना मन, कगार की आग, समय साक्षी हैं, तुम्हारे लिए, सुराज या महत्त्वाच्या आहेत. अन्य कहानियाँ, रथचक्र, मनुष्यचिन्ह, जलते हुए डैने तथा अन्य कहानियाँ, हिमांशू जोशी की चुनी हुई कहानियाँ, प्रतिनिधी लोकप्रिय कहानियाँ, इस बार फिर बर्फ गिरी तो, सागर तट के शहर, अगला यथार्थ, पाषाण गाथा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नील नदी का वृक्ष, एक आंख की कविता, अग्निसंभव हे कवितासंग्रह, संकलन उत्तर पर्व, आठवा सर्ग, साक्षात्कार की किताब मेरा साक्षात्कार ही वैचारिक लेखांची मालिका तर सूरज चमके आधी रात हे प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सुराज कादंबरीवर चित्रपट निघाला. तुम्हारे लिए कादंबरीवर टीव्ही मालिका सादर झाली. तर्पण व सूरज की ओर या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी चित्रपट निघाले. साहित्यवाचस्पती, हेन्रिक इब्सेन इंटरनॅशनल अॅवॉर्ड , अवंतीबाई सन्मान, गणेश शंकर विद्यार्थी सन्मान, हिन्दी साहित्य अकादमी अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी होते.