ऑड्री हेपबर्न या अभिनेत्रीचं नुसतं नाव घेतलं तरी काळा बिनबाह्य़ांचा झगा आणि मानेखाली पैठणीच्या काठाएवढा रुंद कंठा ल्यालेली हरिणाक्षी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहणं ही रसिकतेची एक खूण असेल; तर ऑड्रीचा हा पोशाख ‘ब्रेकफास्ट अॅट टिफनीज्’ या १९६१ सालच्या चित्रपटातला आहे हे माहीत असणं, ही रसिकतेला माहितीची जोड असल्याची खूण मानावी लागेल.. आणि ऑड्री हेपबर्न ही देहप्रदर्शन करणारी पुष्कळा वगैरे नसूनही, तिच्या रुबाबदार पोशाखांसकटच ती लक्षात राहते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे सारे पोशाख फ्रेंच फॅशन-डिझायनर ह्य़ूबर्ट डि जिवान्शी यांनी घडविले होते हेसुद्धा माहिती असणं, म्हणजे तर चतुरस्र, चोखंदळ रसिकतेची परमावधीच! समजा हे काहीही माहितीच नसेल, तरी हल्ली आपल्या महाराष्ट्रीय मंडळींच्या समारंभांत काही कॉलेजकन्यका घालतात तो ‘इव्हिनिंग गाऊन’ पाहा.. त्या लांब घोळदार झग्यांपैकी काहींना जी खांद्यांवर किंचितशी रुळणारी उडत्या कॉलरसारखी ‘केप’ असते ती पाहा.. ही स्टाइल- अगदी मराठीतल्या ‘कलाशैली’ या अर्थानं स्टाइल- ह्य़ूबर्ट डि जिवान्शी यांची! ते ९१ वर्षांचे होते, थकले होते. साधारण १९९५ पासून त्यांनी ‘जिवान्शी’ या आपल्याच नावाच्या कंपनीतून पूर्णत: निवृत्तीही घेतली होती, तरीही त्यांची निधनवार्ता सोमवारी आली तेव्हा अनेक जण हळहळले. ही हळहळ प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली नव्हती. ‘जिवान्शी’ या त्यांच्या ब्रॅण्डमुळे त्यांची महती पाश्चात्त्य जगात आणि ते जग परकं न मानणाऱ्या इतरही अनेकांना ठाऊक होती. जिवान्शी यांच्यावरला ५० मिनिटांचा लघुपट (सन २०१५, दिग्दर्शक : एरिक पेरेलिन) पाहिलेले, ‘व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम’च्या फॅशन विभागात जिवान्शीकृत प्रावरणे बघितलेले किंवा गेल्याच जूनमध्ये ह्य़ूबर्ट यांचा जणू जीवनगौरव म्हणून त्यांच्या समग्र कार्याचा आढावा घेणारं ‘जिवान्शी’ हे प्रदर्शन पाहिलेले लोक कदाचित कमी असतील.. पण ऑड्री हेपबर्नखेरीज जॅकेलीन केनेडी-ओनॅसिस, इन्ग्रिड बर्गमन, मारिया कॅलास, ग्रेटा गाबरे अशा अनेक महत्त्वाच्या पाश्चात्त्य पुरंध्रींचा आब राखणाऱ्या पोशाखांमागे जिवान्शी हेच नाव आहे, याची कल्पना नक्कीच अनेकांना होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा