‘रंगप्रभू’ चित्रकार ना. श्री. बेन्द्रे बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठ कला विभागात आले, तेव्हा हकू शाह विद्यार्थी होते. शाळकरी वयात ‘चलेजाव’ चळवळीचा संस्कार झालेले हकुभाई तरुणपणी बेन्द्रे यांच्या रंग-संस्कारांत रंगले. चित्रकलेतल्या भारतीयतेचा शोध घेणाऱ्या पिढीत सामील झाले. परंतु ‘खेडय़ाकडे चला’ हा संदेश त्यांना अस्वस्थ करीत असे, खेडय़ांतल्या कलेचे काय करायचे, हा प्रश्न पडत असे. ते गावागावांतील दृश्यकलेचे नमुने रेखाटनवहीत टिपू लागले. १९६८ मध्ये ‘रॉकेफेलर पाठय़वृत्ती’वर अमेरिकेस गेले असता भारत-अभ्यासक स्टेला क्रॅम्रिश यांना ‘अननोन इंडिया’ या प्रदर्शनाच्या उभारणीत हकुभाईंनी मदत केली आणि तेथून परतले ते ग्रामीण-आदिवासी कलांचे संग्रहालय उभारण्याचे ठरवूनच. हे स्वप्न पुढल्या आयुष्यात खंडितपणे पूर्ण झाले. गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद) येथे दृश्यकला विभागात शिकवत असताना त्यांनी संग्रहालय उभारले, तर पुढे उदयपूरच्या ‘शिल्पग्राम’ची उभारणी केली.
त्यांची स्वत:ची चित्रेदेखील आता अधिकाधिक स्पष्ट, एखादा विषय ठसठशीतपणे मांडणारी होऊ लागली. रंगसंगतीची बेन्द्रे-प्रणीत वैशिष्टय़े काही प्रमाणात कायम राहिली, पण पुढे एकरंगी चित्रेही हकुभाईंनी केली. गांधीजींच्या जीवनातील प्रसंगांची चित्रमालिकाच त्यांनी केली आहे, त्यातील गांधीजींना ओळखू येण्याजोगा चेहरा नाही. शैलीचा भाग म्हणून तो धूसर आहे. तरीही, हे गांधीजीच असे कुणीही म्हणावे, अशी ती चित्रे आहेत. गुजरातमधील ‘पिठोरा’ चित्र-परंपरेचा सखोल अभ्यास हकुभाईंनी केला होता. आधुनिक शैलीच्या दृश्यवैशिष्टय़ांसह, पिठोरा व अन्य लोक-शैलींतील साधा-स्पष्ट आशयही त्यांच्या चित्रांत दिसत असे. ‘गांधीवादी चित्रकार’, ‘लोककलांचे अभ्यासक’, ‘दृश्यकलेचे मानववंशशास्त्रीय तज्ज्ञ’ अशा विविध नात्यांनी ओळखले जातानाच, स्वत: चित्रे रंगविणे हकुभाईंनी थांबविले नाही. १९८९ साली ‘पद्मश्री’, १९९७ मध्ये दिल्लीच्या ‘आयफॅक्स’या चित्रकार-शिखरसंस्थेचा ‘कलारत्न’ पुरस्कार, तर १९९८ मध्ये ललित कला अकादमीचा ‘कला शिरोमणी’ हा सन्मान त्यांना मिळाला.
त्यांची राजकीय मते चित्रांमधून थेट प्रकटली नाहीत, परंतु १९९२-९३ मध्ये देशभर बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणाचे पडसाद उमटले असताना कबिराच्या संदेशावर आधारित चित्रे करण्याचे ठरविण्यासारख्या त्यांच्या कृतींतून त्यांचे गांधीवादी राजकारण दिसत राहिले होते.