त्यांच्या नावातच ‘इलाही’ होता!  इलाही म्हणजे परमेश्वर; निष्कांचनतेचे दुसरे रूप. ही अशी निष्कांचन कफल्लकता ज्याच्या अंगी भिनली तोच ‘‘घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा..’’ असे  ‘वेदनेचे संगीत’ शब्दबद्ध करू शकतो. इलाही जमादार यांना तर यात प्रावीण्य लाभले होते. वर्तमानात वेगाने बदलणारे संवेदन ते अचूक हेरायचे अन् कोणतेही इझम् न स्वीकारता केवळ त्या संवेदनांचे अंत:स्थ धागे गझलेतून उलगडत न्यायचे. म्हणूनच  त्यांच्या गझलेत अर्थबोधाचा शोध घेण्याची वेळ कधी वाचकांवर आली नाही. ‘मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे..मी त्यांना, विश्वास म्हणालो, चुकले का हो?’..इतक्या साध्या अन् तरल शब्दात ते आजच्या व्यवहारी जगाचे तत्त्वज्ञान मांडायचे. त्यांची ही  सोपी शैलीच त्यांच्या गझलेचे बलस्थान! या बळावरच त्यांनी मराठी गझलविश्वाला समृद्ध केले. ‘गझल क्लिनिक’ या त्यांच्या अतिशय प्रयोगशील संकल्पनेने अनेक लिहित्या हातांना शब्दांची जाण, भोवतालचे भान दिले. त्यातून नवीन गझलकारांची  चिकित्सक पिढी मराठी साहित्याला मिळाली. सुरेश भट यांनी वाढवलेल्या मराठी गझलेच्या रोपटय़ाला वटवृक्षात परावर्तित करण्याचे खरे श्रेय अर्थातच इलाही जमादार यांचे आहे. पण हे करीत असताना त्यांनी गझलेची नवीन प्रयोगशील वाट जन्माला घातली. ‘‘ए सनम तू आज मुझ को खूबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या तू मला आवाज दे..’’ पहिली ओळ उर्दू अन् दुसरी ओळ मराठी, असा गझलेचा अनोखा छंद बांधला. खरे तर इलाहींची मूळ गझल ही ‘कधी तरी स्वप्नात तुझ्या मी यावे म्हणतो सखये, फूल गुलाबाचे मी तुजला द्यावे म्हणतो सखये..’ अशी, प्रणयाची रंगतदार झालर लपेटून वाचकांपुढे येई. ती वाचताना इलाही प्रेमकवी वाटत. पण, हेच इलाही जेव्हा..‘‘कितीतरी रात्री माझ्या उपाशीच मेल्या। घास मीलनाचे तुजला भरवता न आले॥’’ असे जीवनाचे वास्तवदर्शी चित्र मांडत तेव्हा त्यांच्या गझलेचा खरा ‘पिंड’ कळे. जखमा अशा सुगंधी, भावनांची वादळे, दोहे इलाहीचे, मुक्तक, अशा आपल्या शब्दसंपदेतून त्यांनी बदलती सामाजिक-सांस्कृतिक मूल्ये आणि त्यातील संघर्षही अधोरेखित केला. मराठी, हिंदी, उर्दू दैनिक आणि मासिकांत कविता व गझल लिहिल्या. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी ठरले आणि प्रसिद्धीच्या दृष्टीनेही शानदार आयुष्य जगले. शेवटच्या दिवसांत मात्र.. ‘कसे थोपवू उल्केसम हे कोसळणारे एकाकीपण..’ असे ‘एकाकीपणाचे दोहे’ लिहायची वेळ त्यांच्यावर आली. पण, म्हणून इलाही कधी खचलेले दिसले नाहीत. उलट ‘‘अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर’’ अशा शब्दात एकाकीपणातून जन्मलेल्या वेदनेचाच समाचार घेत इलाही त्यांच्या मूळ ‘इलाही’च्या विश्वात परतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा