वहीद खाँ, विलायत खाँ, इमदाद खाँ, इनायत खाँ अशी नावं नुसती उच्चारली, तरीही कुणाही संगीतरसिकाचा हात कानाच्या पाळीपाशी जाईल. बुजुर्गाबद्दल आदर व्यक्त करण्याची ही खास सांगीतिक पद्धत. इटावा किंवा इमदादखानी घराण्याशी संबंधित अशी ही नावे. गायन कलेच्या क्षेत्रात जशी उस्तादांची तालेवार घराणी निर्माण झाली, तसेच वाद्यांच्या क्षेत्रातही घडले. इमरत खाँ हे अशा एका अभिजात संगीत परंपरेतले ज्येष्ठ सूरबहारवादक. सूरबहार या वाद्याला घनगंभीरतेचे वलय. त्यामुळे ध्रुपदासारख्या शैलीत त्याची खुमारी अधिकच उजळून येणारी. इमरत खाँ यांनी या वाद्यावर असे काही प्रभुत्व निर्माण केले, की त्यांच्या वादनाने रसिक स्वरांच्या सागरात समर्पित होत.

आयुष्यभर कोणत्याही पदाची वा प्रतिष्ठेची तमा न बाळगता खाँसाहेबांनी संगीतसेवा केली; पण वयाच्या उतरणीला लागल्यानंतर जाहीर झालेला पद्मश्री हा बहुमान नाकारण्याचे सौजन्य त्यांच्यापाशी होते. आता असा पुरस्कार मिळायला उशीर झाला, असे त्यांचे म्हणणे. उस्ताद विलायत खाँ आणि उस्ताद इमरत खाँ हे दोघे बंधू. एकाने सतारीवर तर दुसऱ्याने सूरबहारवर अतोनात प्रेम केले. या वाद्याला आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली आणि त्यात रममाण होण्यातच आयुष्याची धन्यता मानली. लहान वयातच वडील इनायत खाँ यांचे निधन झाल्यामुळे इमरत खाँसाहेबांचे पालनपोषण आईकडूनच झाले. तिने घराण्याची संगीत परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी सूरबहार या वाद्याशी गट्टी जमवायला सांगितले. आजोबा बंदेह खाँ यांच्याकडून सूरबहार शिकत असताना इमरत खाँसाहेबही त्यात मनोमन रमले. या विलायत खाँ आणि इमरत खाँ या बंधूंना सोव्हिएत रशिया व पूर्व युरोपात जाण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने न होते तरच नवल. परिणामी उस्ताद इमरत खाँ यांना इंग्लंडमध्ये १९६८ ते १९७० या काळात डार्टिग्टन कॉलेज ऑफ आर्ट्स येथे संगीत अध्यापनाची संधी मिळाली. १९७१ मध्ये लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये कला पेश करण्याची संधी मिळालेले ते पहिले भारतीय संगीतकार होते. संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी असलेल्या इमरत खाँसाहेबांचे चारही पुत्र संगीताचा हा वारसा अधिक जोमाने पुढे नेत आहेत. इमरत यांनी सत्यजित राय यांच्या ‘जलसाघर’ या चित्रपटासाठी संगीत दिले होते. जेम्स आयव्हरीचा ‘द गुरू’, मायकेल केन व सिडनी पॉटियर यांचा ‘दी विल्बी कॉन्सपिरसी’ या चित्रपटांचे संगीत संयोजनही उस्तादजींनी केले. वर्षांतील काही काळ ते नेहमीच वॉशिंग्टन विद्यापीठात विद्यार्थ्यांना सतारीचे धडे देत असत. त्यांच्या निधनाने सूरबहार या वाद्याची एक तार तुटली आहे.

Story img Loader