घरातूनच बाळकडू मिळाले असले की गुणवान खेळाडूची बालपणापासूनच कशी बहरते, त्याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे भारतीय बॅडमिंटनचा उगवता तारा लक्ष्य सेन. उत्तराखंडच्या अलमोडा जिल्ह्यात १६ ऑगस्ट २००१ साली जन्मलेल्या लक्ष्यचे वडील डी. के. सेन हे राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत आणि मोठा भाऊ चिराग सेन हादेखील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू. त्यामुळे पहिली पावलेसुद्धा बॅडमिंटन रॅकेट आणि शटलकॉकच्या सान्निध्यातच त्याने टाकली. दहाव्या वर्षीच तो त्याच्या वयोगटातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये झळकू लागला होता. प्रारंभिक शिक्षण वडिलांकडूनच घेतल्यानंतर त्याला प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकॅडमीत पुढील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.
लक्ष्यने २०१६ सालात, म्हणजे वयाच्याही सोळाव्या वर्षांत लक्ष्यने मलेशियाच्या ली झी जियाला हरवून इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद तसेच १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. मात्र, या दोन्ही विजेतेपदांपेक्षा एका अनोख्या पराभवाने त्याच्या अस्तित्वाची दखल बॅडमिंटन जगताने घेतली. न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतला तो सामना होता दोनदा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता ठरलेल्या चिनी खेळाडू लीन डॅनसमवेत. हा सामना लीन डॅनच जिंकणार असेच सगळ्यांना वाटत होते. मात्र, पहिल्याच गेममध्ये लीनला मागे टाकत लक्ष्यने खळबळ उडवून दिली. पुढचे दोन गेम जिंकून घेत लीनने सामन्यात बाजी मारली, मात्र त्या सामन्यापासून लक्ष्यने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याशिवाय २०१७ साली लक्ष्यने युरेशिया बल्गेरियन खुल्या तर इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपद आणि टाटा खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावत त्याची घोडदौड कायम राखली. यंदा वर्षांरंभीच्या काळात त्याच्या खांद्याची दुखापत बळावल्याने त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. हा सल्ला शिरोधार्य मानत त्याने खांद्याला तर पूर्ण आराम दिला, पण त्याच काळात आपल्या छातीखालच्या शरीराच्या तंदुरुस्तीवर त्याने विशेष लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पायाचे, कमरेचे विविध प्रकाराचे व्यायाम करून त्याने शरीराचा खालील भाग भक्कम केल्याचा फायदा त्याला रविवारच्या लढतीत मिळाला. दोन वर्षांपूर्वी ज्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेत लक्ष्यने कांस्य पटकावले होते, त्याच स्पर्धेत त्याने अग्रमानांकित थायलंडच्या कुनलावुत वितीदसॅम याला पराभूत करून विजेतेपद पटकावत त्याने अजून एक ‘कनिष्ठ’ लक्ष्यपूर्ती केली आहे.
नजीकच्या भविष्यात ऑक्टोबरमध्ये होणारी युवा ऑलिम्पिक स्पर्धा आणि नोव्हेंबरमध्ये होणारी जागतिक कनिष्ठ चॅम्पियनशिप या स्पर्धा त्याचे लक्ष्य राहणार आहेत. तसेच नजीकच्या भविष्यात खुल्या गटातील स्पर्धामध्येही त्याने विजेतेपद पटकावल्यास कुणालाच आश्चर्य वाटणार नाही.