सागरात जिवाची बाजी कधी लागेल सांगता येत नाही. २०१५च्या जूनमध्ये घडलेली घटना अशीच होती. आंध्र प्रदेशातील दुर्गाम्मा बोटीवरचे सात मच्छीमार त्यांच्या बोटीचे इंजिन बिघडल्याने वाहून गेले. हवामानही खराब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ‘ते कधीच परत येणार नाहीत’ असे गृहीत धरून अन्त्यविधीसाठी मनाची तयारी केली होती, पण एक साहसी महिला कॅप्टन राधिका मेनन या केरळकन्येने बंगालच्या उपसागरात र्मचट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून काम करीत असताना त्या सर्वाना वाचवले. ते सर्व जण वाचल्याचा फोन आला तेव्हा त्यांच्या अन्त्यविधीची तयारी करणाऱ्यांना नियती म्हणून काही चीज असते हे प्रथमच प्रत्ययास आले. त्या नियतीचे नाव होते राधिका. तिला आता इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनचा सागरी शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अतुलनीय सागरी साहसासाठीचा हा पुरस्कार घेणारी, जगभरातील ती पहिलीच महिला ठरेल!
‘सागरी सेवेत प्रवेश केला तेव्हाच हे माहीत होते की, संकटातील कुणालाही वाचवणे अपेक्षित असतेच. मी माझ्या जहाजाची कमांडर होते व मी माझे काम केले,’ असे ती नम्रपणे सांगते.
सागराला कुशीत घेणाऱ्या केरळातील कोडुंगलुर येथील रहिवासी असलेल्या राधिकाला लहानपणापासूनच सागराची ओढ होती त्यामुळेच ती र्मचट नेव्हीत- भारतीय व्यापारी नौकेवर- पाच वर्षांपूर्वी पहिली महिला कॅप्टन म्हणून नियुक्त झाली. सागरी प्रवास करताना संदेशवहनासाठी रेडिओ लहरींचा वापर करतात, त्यामुळे तिने कोची येथील ऑल इंडिया मरीन कॉलेजचा रेडिओ लहरी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यामुळे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेत १९९१ मध्ये ती भारतातील पहिली महिला रेडिओ अधिकारी बनली. २०१० मध्ये तिने मास्टर्स प्रमाणपत्र मिळवले. २०११ मध्ये तिने र्मचट नेव्हीत पहिली महिला कॅप्टन बनण्याचा मान मिळवला व एमटी सुवर्ण स्वराज्य या जहाजावर ती २०१२ मध्ये काम करू लागली. मच्छीमार बेपत्ता झाल्याचे तिने पाहिले, त्या वेळी (२२ जून २०१५) ती शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ‘संपूर्ण स्वराज’ या तेलवाहू टँकर-जहाजावर कप्तान होती. ‘दुर्गाम्मा’ मच्छीमारी नौकेतील या सात जणांचा माग आंध्र प्रदेश ते ओडिशातील गोपाळपूपर्यंत काढला व त्यांना सोडवण्यात यश मिळवले. ताशी ६० सागरी मैल वेगाने वाहणारे वारे, २५ मीटपर्यंतच्या लाटा आणि धुवाधार पाऊस असताना वादळात तेलवाहू जहाजालाही धोका होता; पण तांत्रिक कौशल्य आणि न डगमगता अचूक निर्णय घेण्याची क्षमता यामुळे तिने हे काम केले!
येत्या २१ नोव्हेंबर रोजी लंडन येथे तिला इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या पुरस्कारासाठी २३ नामनिर्देशने आली होती, त्यांतून निवड झालेले तिचे धैर्य सलाम करण्याजोगेच आहे.