ज्ञान, जाणकारी आणि हातोटी या पातळीवर ‘विदुषी’ हा शब्दगौरव ज्यांच्यासमोर थिटा पडावा अशा महाराष्ट्रातील मोजक्या व्यक्तींमध्ये शांता गोखले यांचे नाव घेता येईल. अभिजात आणि आधुनिक मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी सेतू उभारण्याचेच कार्य त्यांनी केले नाही, तर मराठी तसेच सर्वभाषिक प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासाची पाने आपल्यासमोर उलगडून ठेवली. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गो.पु. देशपांडे यांच्या भारदस्त नाटकांना इंग्रजी भाषेचा साज चढवून त्यांना त्यांनी जागतिक पटलावर पोहोचविले. हे करताना आपल्या स्वतंत्र लेखनाचा आब राखला. मराठी साहित्य, रंगभूमी, पत्रकारिता, चित्रपट, टीव्ही माध्यम या सांस्कृतिक क्षेत्रांत सारख्याच ताकदीने काम करणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती असतील.
ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात जन्मलेल्या शांता गोखले यांचे बालपणी पहिले स्थलांतर झाले ते मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कमध्ये. बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधील शिक्षणानंतर जागतिक रंगभूमी, साहित्याची आद्यभूमी मानल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील दुसऱ्या स्थलांतरात त्यांनी तेथील विद्यापीठात इंग्रजी साहित्यात पदवी मिळविली. पुन्हा भारतात परतून संज्ञापन आणि त्या काळी नव्या असलेल्या व्हिडीओनिर्मितीचे शिक्षण घेतले. एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापकीचे धडे गिरवीत असताना त्यांच्या स्वतंत्र लिखाणाला सुरुवात झाली. साठोत्तरीतल्या प्रायोगिक कथासाहित्याच्या विश्वात त्यांचे मराठी कथालेखन सुरू झाले. ‘मौज’, ‘सत्यकथा’ आणि ‘लिटिल् मॅगझिन’च्या उदयास्ताच्या या काळात त्यांची ‘रिटा वेलीणकर’ ही कादंबरी प्रकाशित झाली. रूढार्थाने त्या काळी प्रस्थापित आणि प्रतिष्ठित स्त्रीवादी लेखिकेच्या समांतर विश्वात ही कादंबरी वेगळी म्हणून वाखाणली गेली. पुढे याच कादंबरीचा इंग्रजी अनुवाद त्यांनीच ताकदीने साकारला. मराठी साहित्यामध्ये मुशाफिरी करतानाच ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कला विभागाच्या संपादिका आणि ‘फेमिना’ मासिकामध्ये त्यांची पत्रकारिता सुरू होती. मराठीमधून इंग्रजी पत्रकारितेमध्ये मुरल्यानंतर त्याच वेळी मराठीमध्ये अफाट पातळीवर सक्रिय राहण्याची अद्भुत किमया शांता गोखले यांनी साधली आहे. गोडसे भटजींचा ‘माझा प्रवास’, लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, दुर्गा खोटे यांचे आत्मचरित्र, विजय तेंडुलकरांची ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’ ही नाटके, महेश एलकुंचवारांची त्रिनाटय़धारा, आळेकरांचे ‘बेगम बर्वे’, उद्धव शेळके यांचे आत्मकथन मराठीबाह्य़ विश्वाला त्यांच्याद्वारे उमजले. मराठीत लिहिल्या गेलेल्या समीक्षेतील असाधारण ताकदीची पारख करीत त्यांनी अरुण खोपकर यांचे गुरुदत्त यांच्यावरील तर प्रभाकर बरवे यांचे चित्रकलेतील गाजलेले पुस्तक ‘कोरा कॅनव्हास’ इंग्रजीत अनुवादित केले. २००८ साली त्यांची ‘त्या वर्षी’ ही दुसरी स्वतंत्र कादंबरी प्रकाशित झाली असली तरी यादरम्यान १८४३ ते २००० काळातील मराठी रंगभूमीचा इतिहास त्यांनी लिहिला. (तो इंग्रजीतही पोहोचविला.) मराठीतील आजघडीचे आधुनिक मानले जाणारे कादंबरीकार मकरंद साठे यांची ‘अच्युत आठवले आणि आठवण’ त्यांनी इंग्रजीत नेली. मानव हक्क कार्यकर्त्यां इरोम शर्मिला यांच्यावर त्या नाटक लिहीत आहेत. अभिजात आणि आधुनिक साहित्यात सारख्याच भाषिक ताकदीने सक्रिय राहिलेल्या शांता गोखले यांना महाराष्ट्र फौंडेशनचा नुकताच मिळालेला जीवनगौरव म्हणूनच त्यांचा यथोचित सन्मान आहे.