कणखर, कनवाळू, निश्चयी, धीरोदात्त, संयमी, प्रामाणिक अशी सर्व विशेषणे जिच्या नावापुढे जोडली जाताहेत ती ३८ वर्षांची आहे. एवढय़ा लहान वयात एका देशाचं नेतृत्व करणारी सध्या तरी ती एकमेव. ख्राइस्टचर्चमधील दोन मशिदींवर गोळीबार करून श्वेतवर्णीय ऑस्ट्रेलियन कट्टरतावाद्याने ५० निरपराध लोकांचे प्राण घेतल्यानंतर ही बाई सर्व पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन तेथे पोहोचली. डोक्यावर हिजाब (स्कार्फ), डोळ्यांत दुख आणि चेहऱ्यावर निर्भयता. मृतांच्या नातलगांना भेटली तेव्हा जणू ती एक सामान्य स्त्री होती आणि अन्य सामान्य स्त्रियांचं दुख वाटून घेत होती. शिवाय, तिने तिथल्या तिथे त्वरेने एक निर्णय घेतला. न्यूझीलंडमधील बंदूक परवाना कायदा कठोर करण्याचा. तिची हीच निर्णयक्षमता सर्वाच्या नजरेत भरते. हल्ल्यानंतर चार दिवसांनी संसदेच्या विशेष सभेत ती म्हणाली, तो गुन्हेगार आहे, म्हणून मी त्याचं नाव उच्चारणार नाही. आपण सर्वानी त्याच्या अघोरी कृत्यात बळी पडलेल्यांचे नामस्मरण करू या. तो आपल्या देशात जन्मलेला नाही, वाढलेलाही नाही. त्याची विचारधाराही इथली नाही, पण त्याच्यासारखे कट्टरतावादी आपल्या देशात नाहीत, असे म्हणता येणार नाही.. इतका प्रामाणिकपणा, तोही अप्रामाणिकपणा हा नेत्याचा सर्वोच्च गुण ठरत असल्याच्या युगात.

देशातल्या एका भागात अनवाणी भटकणारी, भुकेली मुले पाहिल्यावर तिने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान हेलन क्लार्क यांच्या कार्यालयात नोकरी केली. त्याच तिच्या राजकीय गुरू आणि आदर्श आहेत. २००५ मध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या कार्यालयात मोठय़ा पदावर काम, त्यानंतर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेचे अध्यक्षपद, पुढच्याच वर्षी न्यूझीलंडच्या संसदीय राजकारणात प्रवेश आणि २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधानपद. पंतप्रधान झाल्यानंतर कार्यालयातच बाळाला जन्म देणं, तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या सभेत सहभागी होणं.. अशा काही गोष्टींमुळे ती चच्रेत राहिली. पण तिच्या वागण्यातला सच्चेपणा नजरेत भरला तो ख्राइस्टचर्च हल्ल्यानंतर. ‘हो, तुम्ही आमचे आहात,’ या तिच्या शब्दांनी सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. ‘प्रामाणिकपणा हा नेत्याचा निर्वविादपणे सर्वोच्च गुण असला पाहिजे,’ असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर म्हणाले होते. हाच प्रामाणिकपणा तिला न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदापर्यंत घेऊन गेला, असं म्हणावं लागेल. ही ती म्हणजे.. जेसिंडा आर्डन!

Story img Loader