भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची क्रिकेटेतिहासात निधनोत्तर नोंद करायची नेमकी कोणत्या खात्यात? भारतीय क्रिकेटला अर्थबळ देणारा उत्तम प्रशासक म्हणून की क्रिकेटचा एक व्यापारी म्हणून? कुशल संघटक म्हणून की भ्रष्टाचारी अर्थकारणी म्हणून? बीसीसीआयच्या हिशेबात घोटाळे केल्याचा त्यांच्यावरील आरोप सर्वोच्च न्यायालयाने केव्हाच पुसून टाकला आहे. ते आरोप, खटले हा भारतीय क्रिकेटवरील वर्चस्वाच्या लढाईचा एक भाग होता. शरद पवार, एन. श्रीनिवासन यांच्यासारख्या खेळाडूंनी केलेली ती बॉडीलाइन गोलंदाजी होती, हेही आता समोर आले आहे. त्या आरोपांमुळे दशकभर दालमिया यांना बीसीसीआयच्या नेतृत्वापासून दूर राहावे लागले. पण रविवारी ते गेले ते अध्यक्षपदाच्या खुर्चीवरूनच. गेल्या मार्चमध्येच ते पद त्यांच्याकडे चालत आले होते. वयाच्या ३९व्या वर्षी ते बीसीसीआयमध्ये दाखल झाले तेव्हा ही संघटना तशी दुबळीच होती. गावसकर, विश्वनाथ, वेंगसरकर, कपिलदेव असे खेळाडू असले तरी एकंदर संघाची कामगिरीही फार काही लक्षणीय नव्हती. अशा काळात १९८३ च्या प्रुडेन्शियल विश्वचषक स्पध्रेत कपिलदेवच्या संघाने वेस्ट इंडिजला हरवले व भारतीय क्रिकेटचा जणू भाग्योदय झाला. भारतात एकदिवसीय क्रिकेटचा पंथ रुजला. बीसीसीआयच्या अर्थकारणाने त्यानंतर अशी काही उसळी घेतली की आज ती जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. पण याला आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली होती- बीसीसीआयचे तेव्हाचे अध्यक्ष एनकेपी साळवे यांचा लॉर्डसमधील मेरिलबोन क्रिकेट क्लबने केलेला अपमान. अवघ्या दोन प्रवेशपत्रिका देण्यास त्यांनी दिलेला नकार साळवे यांना झोंबला. क्रिकेटची आíथक राजधानी भारतात आणण्याचा चंग त्यांनी बांधला. ती कामगिरी त्यांनी सोपविली ती दालमिया व आय एस िबद्रा यांच्याकडे. त्यांचे पहिले लक्ष्य होते भारतात विश्वचषक स्पर्धा आणण्याचे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेची मदत घेतली. १९८७ च्या विश्वचषकासाठी इंग्लंडची बोली ४ हजार पौंडांची होती. यांनी २० हजार पौंड देऊन स्पर्धा भारतात आणली. प्रायोजक होते धीरुभाई अंबानी. दालमिया आणि िबद्रा यांनी त्या वेळी आणखी एक खेळी केली. दूरचित्रवाणी प्रक्षेपणातील दूरदर्शनची एकाधिकारशाही मोडून काढत हे क्षेत्र खुले करून बीसीसीआयकडे पशांचा ओघ वळवला. पुढे धनाढय़ प्रायोजक या खेळावर फिदा झाले (ती हाव आयपीएलपर्यंत वाढत गेली). त्यातून क्रिकेटचे अंतिमत: किती भले झाले हा वादाचा विषय. त्यासाठी दालमिया यांची कोणी कितीही िनदा केली तरी अनेक क्रिकेटपटू मात्र दालमियांचे ऋणी आहेत. त्यांच्यासाठी ते ‘जग्गूदादा’ आहेत. या प्रेमात दालमिया यांच्या खेळाडूंकडे या अर्थकारणाचे प्रमुख भागधारक म्हणून पाहण्याच्या वृत्तीचा वाटा आहे, तेवढाच तो एकेकाळच्या या यष्टीरक्षकाने क्रिकेटला मिळवून दिलेल्या श्रीमंतीचाही आहे, हे विसरता येणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा