‘इस तरह से बोल्ड हुए हैं अजय जडेजा.. गेंद को शायद चंडीगढ पहुंचाना चाहते थे.. लेकिन..’ विख्यात समालोचक जसदेव सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका सामन्यात अजय जडेजाने केलेल्या हाराकिरीचे वर्णन इतक्या शब्दांमध्ये केले. मोजक्याच शब्दांमध्ये, खरोखरच हसवणारा विनोद पेरून सामन्यातील एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची ही शैली जसदेव सिंग यांनी वर्षांनुवर्षे जोपासली होती. सुमारे ५० वर्षे त्यांच्या खर्जातल्या आवाजातील समालोचनाने किमान तीन पिढय़ांवर गारूड केले होते. हा आवाज नुकताच कायमचा शांत झाला.
क्रीडा समालोचक अशी त्यांची मुख्य ओळख. नऊ ऑलिम्पिक स्पर्धा, सहा आशियाई स्पर्धा आणि आठ हॉकी विश्वचषक स्पर्धाचे समालोचन त्यांनी प्रथम आकाशवाणी आणि नंतर दूरदर्शनसाठी केले. याबरोबरच जवळपास ४५ प्रजासत्ताक दिन संचलने आणि लालबहादूर शास्त्री व राजीव गांधी यांच्या अंत्ययात्रा जसदेव सिंग यांनी भारतीयांपर्यंत पोहोचवल्या. अंत्ययात्रांच्या वेळी हुंदका आवरणार नाही असे काही प्रसंग आल्याची आठवण ते सांगत. पण समालोचक हा केवळ कॅमेरा असतो आणि कॅमेरा कधी रडत नाही, असा त्यांचा शिरस्ता! संचलनांचे समालोचन करतानाही, शब्द आणि आवाजातून राष्ट्रप्रेम व्यक्त होईल, पण राष्ट्रवाद ओसंडणार नाही याची खबरदारी त्यांनी नेहमीच घेतली. ते खऱ्या अर्थाने रमले क्रीडा समालोचनात. आवाजाच्या पट्टीतील सातत्य, हिंदी आणि उर्दू भाषांवर पकड आणि खेळातल्या बारकाव्यांची इत्थंभूत माहिती हे त्यांच्या समालोचनाचे वैशिष्टय़ होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी सामन्यांच्या त्यांनी केलेल्या समालोचनाच्या आठवणी आजही जुन्या पिढीतील हॉकीप्रेमी सांगतात. हॉकी किंवा क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन हिंदीतून कसे काय करता येईल, असा प्रश्न विचारून सुरुवातीला त्यांना खिजवले जायचे. मात्र हॉकीसारखा राष्ट्रीय खेळ शेतकऱ्यांपासून गृहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी तो देशी भाषेतूनच वर्णिला गेला पाहिजे, अशी जसदेव सिंग यांची ठाम धारणा होती. बहुविध खेळांच्या स्पर्धाचे (ऑलिम्पिक, एशियाड) समालोचन हीदेखील त्यांची खासियत होती. नवी दिल्लीत १९८२मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या, त्या वेळी हिंदी समालोचकांच्या चमूचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. स्पर्धेच्या सहा महिने आधीच ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पतियाळातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात गेले. तेथे प्रशिक्षण घेत असलेल्या क्रीडापटूंकडून, प्रशिक्षकांमार्फत त्यांनी विविध खेळांतील बारकावे आपल्या सहकाऱ्यांना समजावून सांगितले. गृहपाठ हा जसदेव यांच्या समालोचनाचा कणा होता. कोणत्याही सामन्याच्या अर्धा-पाऊण तास आधी ते येत आणि टिपणे काढून ठेवत. १९८८मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने त्यांना ऑलिम्पिक चळवळीच्या प्रसाराबद्दल गौरवले होते. १९८५मध्ये पद्मश्री आणि २००८मध्ये पद्मभूषण हेदेखील त्यांचे गौरवच. भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी अत्यंत निराशाजनक ठरलेल्या कालखंडातही जसदेव सिंग यांच्या आवाजाने एक आशावाद जिवंत ठेवला होता. विख्यात समालोचक रिची बेनॉ यांच्याप्रमाणेच जसदेवही मोजक्या शब्दांमध्ये भरपूर काही सांगणारे होते. समालोचकाने केवळ पाहायचे नसते, तर (प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत) काहीतरी अर्थपूर्ण असे पोहोचवायचे असते, हा नियम त्यांनी आयुष्यभर पाळला.