व्यक्तिकेंद्री उपकरणांच्या (पर्सनल टेक्नॉलॉजी) क्षेत्रातले आद्य उपकरण म्हणजे पॉकेट कॅल्क्युलेटर किंवा गणकयंत्र. मोबाइल फोनवरील असंख्य अ‍ॅप्सच्या जंजाळात कुठे तरी दडून बसलेले एक अ‍ॅपइतपतच बहुसंख्यांना कॅल्क्युलेटरची ओळख असली, तरी आजही सनदी लेखापालांपासून ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत गुंतागुंतीच्या असंख्य हिशेबांसाठी पॉकेट कॅल्क्युलेटरचाच वापर होत असतो. या पॉकेट कॅल्क्युलेटरचे एक सहनिर्माते जेरी मेरिमन यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याकडे कोणत्याही पदवीविना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात स्वत:हून मिळवलेले असीम ज्ञान होते. हेर्न या टेक्सासमधील एका गावात त्यांना जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी त्यांची आई गेली आणि ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांना अकाली अंधत्व आले. त्यामुळे वयाच्या ११व्या वर्षीच चरितार्थासाठी त्यांना एका रेडिओदुरुस्ती दुकानात काम करणे भाग पडले. त्यात त्यांनी अल्पावधीतच प्रावीण्य मिळवले होते. इतके की, कोणताही गुन्हा केलेला नसतानाही हेर्नमधील पोलीस त्यांचा मागावर असत.. कारण पोलिसांच्या मोटारींमधील बिघडलेले रेडिओ मेरिमनच दुरुस्त करू शकायचे! हेर्नमधील त्या दुकानात ‘रेडिओ इंजिनीअिरग’ हे पुस्तक मेरिमन यांच्या हाती लागले. ते त्यांनी आयुष्यभर स्वत:जवळ जपले. रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ‘सर्किट्स’ची गुंतागुंत जाणून घेण्यात या पुस्तकाची त्यांना फारच मदत झाली. त्याच्याच जोरावर आणखी एका दुकानात त्यांनी रेडिओ इंजिनीअर म्हणून काम केले. टेक्सास अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड मेकॅनिकल युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला खरा, पण पदवीचा अभ्यासक्रम काही पूर्ण केला नाही. मार्च १९६३ मध्ये टेक्सास इन्स्ट्रमेंट्स कंपनीत त्यांनी नोकरी स्वीकारली आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तेथे त्यांना जॅक किल्बीसारख्या मातब्बर संशोधकाबरोबर (किल्बी पुढे नोबेल पारितोषिक विजेते ठरले) काम करण्याची संधी मिळाली. टेक्सास इन्स्ट्रमेंट्स ‘इंटिग्रेटेड सर्किट्स’ बनवत होती, पण एखादे ग्राहकोपयोगी उपकरण बनवावे, असा आग्रह कंपनीचे मालक पी. हॅगर्टी यांनी धरला. मेरिमन, किल्बी आणि जेम्स व्हॅन टॅसेल यांना या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. प्रस्तावित गणकयंत्राचे सर्किट जाळे मेरिमन यांनी तीन दिवस आणि तीन रात्री खपून तयार केले. कॅलटेक असे नामकरण झालेले पहिलेवहिले गणकयंत्र १९७०च्या सुरुवातीस विकसित झाले. याच उपकरणाबरोबर औष्णिक घटसंच (थर्मल बॅटरी) आणि छपाईच्या संशोधनातही मेरिमन यांचे योगदान होते. टेक्सास इन्स्ट्रमेंट्सने ते पहिलेवहिले गणकयंत्र अमेरिकेच्या राष्ट्रीय संग्रहालयाला कालांतराने भेट म्हणून दिले. तिथे एका बाजूला थॉमस एडिसन यांचे उपकरण आणि दुसऱ्या बाजूला अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या उपकरणाच्या मधोमध ‘कॅलटेक’ला जागा मिळाली!

Story img Loader