कराटे वा तत्सम अन्य युद्धकलांबद्दल कित्येक चित्रपट आले आणि गेले. नंतरच्या काळात याच कथानकांवरील चित्रवाणी मालिकाही निघू लागल्या आणि गेल्या काही वर्षांत तर या चिनी युद्धकलांवर बेतलेले ‘व्हिडीओ गेम’ आणि पुढे संगणक-खेळ यांचाही सुळसुळाट झाला. या साऱ्या स्थित्यंतराला पुरून उरल्या त्या जिन याँग यांच्या ‘वुक्षिआ’ प्रकारातील कथा-कादंबऱ्या! युद्धकलांवर म्हणजेच ‘मार्शल आर्ट्स’वर आधारित नायकाच्या कथांना चीनमध्ये  शतकानुशतके ‘वुक्षिआ’ म्हणतात. सुष्टांचा विजय, दुष्टांचा नाश- हेच या सर्व ‘वुक्षिआ’ कथांचे सार! पुन्हा या साऱ्याच कल्पित गोष्टी. इतिहासाचा समजा आधार असलाच, तर तो नावापुरताच. बाकी सारा लेखकाचा मीठमसाला. मात्र जिन याँग हे या कथांचे बादशहा.. त्यांच्या ३८ कादंबऱ्यांवर आणि १३ कथांवर चित्रपट किंवा चित्रवाणी मालिका निघाल्या. छोटय़ा वा मोठय़ा पडद्यावर त्यांचे नाव एकंदर ७७ चित्रपट/ मालिकांचे ‘लेखक’ म्हणून झळकले आणि वाचक? ते तर होतेच भरपूर.. गेल्या तीन पिढय़ांत, जिथे जिथे एक तर चिनी किंवा ‘वुक्षिआ’प्रेमी वाचक आहेत, त्या-त्या साऱ्या देशांमध्ये जिन याँग पोहोचले होते.. त्याशिवाय का त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या एकंदर ३० कोटी प्रती बाजारात आल्या (आणि विकल्याही गेल्या)?

‘वीरधवल’ ते ‘काळापहाड’ यांची मराठीतील (एके काळची) लोकप्रियता आठवून पाहा.. त्याच्या किती तरी पट लोकप्रियता मिळवण्यास जिन याँग यांनी १९५५ पासून जी सुरुवात केली, ती आजतागायत! समीक्षकांनी विसाव्या शतकापासून रुळलेला ‘नव-वुक्षिआ’ हा वेगळा वाङ्मय प्रकार मानला, त्याला जिन याँग यांची ही अचाट लोकप्रियता कारणीभूत होती. अमेरिकेतील चीन-अभ्यासक जॉन ख्रिस्तोफर हॅम यांनी या लोकप्रियतेचा धांडोळा घेणारे ‘पेपर स्वोर्ड्समेन’ हे पुस्तक लिहिले. ‘अलीबाबा.कॉम’चे जॅक मा यांच्यासह अनेक यशस्वी चिनी लोक जिन याँग यांचे चाहते आहेत, हे ३० ऑक्टोबर रोजी जिन याँग यांची निधनवार्ता आल्यावर जगजाहीर झाले.

जिन याँग यांचे खरे नाव ‘शा लिआंग्याँग’ असे होते; ते बदलून त्यांनी ‘लुई चा’ असे सुटसुटीत केले होते. त्यांचा जन्म चीनच्या झिजिआंग प्रांतातील हैनिंग इथला, फेब्रुवारी १९२४ मधला. त्यांना राजनैतिक अधिकारी व्हायचे होते.  महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, १९४७ साली केवळ आर्थिक चणचणीमुळे ते पत्रकार म्हणून अर्धवेळ नोकरीही करीत होते; पण १९४३ पासून सत्तारूढ झालेल्या माओच्या साम्यवादी राजवटीचे रंग स्पष्ट होऊ लागल्याने आपला इथे टिकाव नसल्याचे ओळखून १९४८ मध्ये शा लिआंग्याँग हे  हाँगकाँगमध्ये आले. १९५३ मध्ये एका नियतकालिकाने त्यांना धारावाहिक कादंबरी लिहिण्याची संधी दिली. ही कादंबरी १९५५ मध्ये पुस्तकरूप झाली, तर १९५७ मध्ये त्यांच्या कथेवर चित्रपट तयार झाला. मग १९५९ मध्ये भागीदारीत ‘मिंग पाओ’ हे स्वतंत्र वृत्तपत्रच त्यांनी सुरू केले. या ‘मिंग पाओ’चा खप वाढण्याचे मुख्य कारण, त्यांच्या धारावाहिक कादंबऱ्या हेच होते. वयाच्या नव्वदीनंतर त्यांना कर्करोग जडला, विस्मरणाचा त्रासही सुरू झाला आणि ९४ व्या वर्षी ते निवर्तले.

Story img Loader