तो काळ १९७१ मधला.. अमेरिकेतील त्या तरुणात लेखनाची प्रचंड असोशी होती. वेगळे काही तरी लिहिण्याचे ठरवूनच त्याने साहित्यात पदार्पण केले. वूल्फ या त्याच्या पहिल्या कादंबरीचे पहिले वाक्य दोन पानांचे होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी टपालाने प्रकाशकांकडे पाठवलेले हे पुस्तक संपामुळे गहाळ झाले. त्यामुळे दुसऱ्यांदा हस्तलिखित पाठवावे लागले होते, पण प्रकाशक व संपादकांना ते पुस्तक नाकारण्याचे धाडस झाले नाही. या तरुणाचे नाव जिम हॅरिसन. अमेरिकी कादंबरीला वेगळी ताकद ज्यांनी दिली अशा जिंदादिल कादंबरीकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. फ्रान्ससह अनेक युरोपीय देशांत त्यांची पुस्तके चांगली खपली, वाचली गेली.
त्यांचा जन्म मिशिगनमधला. लहानपणी त्यांना उनाडक्या करण्याची सवय होतीच पण त्याच्या जोडीला पुस्तकांचे वाचनही होते. पुस्तकांची आवड त्यांना आई नॉर्मा हिच्यामुळे लागली. शालेय शिक्षणानंतर त्यांनी त्यांची पुस्तके, टाइपरायटर घेऊन बोस्टन व न्यूयॉर्क गाठले ते जिप्सीसारखे मुक्तछंदातले जीवन अनुभवण्यासाठी, पण मुकाटपणे मिशिगन स्टेट युनिव्हर्सटिीत प्रवेश घेऊन अभ्यास सुरू केला. १९६४ मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली, त्यांचा भाऊ ग्रंथपाल होता. त्याने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी मदत केली. नंतर त्यांना स्टोनी ब्रूक विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली. कालांतराने ते परत मिशिगनला गेले. वूल्फ : अ फॉल्स मेमॉयर ही त्यांची पहिली कादंबरी. ती चांगली चालली. पुढे, ‘लेटर्स फॉर येसेनिन’ या काव्यसंग्रहात जगणे अवघड झाल्याने आत्महत्येचे विचार त्यांनी प्रकट केले होते. अ गुड डे टू डाय ही त्यांची पुढची कादंबरी. मिसूरी ब्रेक्स या चित्रपटाच्या सेटवर मॅग्वेन यांच्याबरोबर गेले असताना जॅक निकोलसन यांनी त्यांना तीस हजार डॉलर त्या काळात उसने दिले व चित्रपट काढता येतील अशा तीन कादंबऱ्या लिहिण्यास सांगितले. त्यांनी लिजंड्स ऑफ फॉल ही पहिली कादंबरी दहा दिवसांत हातावेगळी केली व रिव्हेंज ही दुसरी कादंबरी दोन आठवडय़ांत पूर्ण केली. लिजंड्स ऑफ फॉल ही कादंबरी चलनी नाणे ठरली, एस्क्वायर नियतकालिकात ती २३ हजार शब्दांत प्रसिद्ध झाली, तर रिव्हेंज कादंबरी ३० हजार शब्दांत प्रकाशित झाली. लिजंड्स ऑफ फॉल ही कादंबरी त्यांनी त्यांच्या पत्नीच्या पणजोबांच्या जर्नल्सच्या आधारे लिहिली. रिव्हेंज व लिजंड्स ऑफ फॉल या दोन्ही कादंबऱ्यांवर नंतर चित्रपट निघाले. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड व एस्क्वायरसाठी त्यांनी स्तंभलेखन केले. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ द रिव्हर्स, ब्राऊन डॉग व द रिव्हर स्वीमर या कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या. तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगला असला तर जीवन म्हणजे नदी आहे.तुमच्या जीवनात अनेक गोष्टी स्पर्शून जातात. तुम्ही थोडेसे विचलित होता, पण तरी जीवनाचा प्रवाह चालूच राहतो. तो थांबवता येत नाही, असे त्यांचे मत होते. त्यांच्या निधनाने एक खळाळता जीवनप्रवाह मात्र थांबला आहे.
जिम हॅरिसन
तो काळ १९७१ मधला.. अमेरिकेतील त्या तरुणात लेखनाची प्रचंड असोशी होती.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 01-04-2016 at 03:13 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jim harrison