अगदी अन्न, वस्त्र निवाऱ्याइतकी नसेल पण जगण्यासाठी विविध कलांचीही तितकीच आवश्यकता असते. कलेमुळे मानवाचे जीवन सुंदर होत असते. आदिम काळापासून मानवी संस्कृतीने विविध कलांची परंपरा जपली आहे. वारली चित्रशैली हे त्याचे ठळक उदाहरण. दूर डोंगरात, दुर्गम पाडय़ांवर केवळ परंपरा आणि हौस म्हणून जपलेली ही वैशिष्टय़पूर्ण चित्रशैली आधुनिक जगासमोर आणणारे जिव्या सोमा मशे हे थोर कलावंत. मंगळवारी त्यांचे निधन झाले. १३ मार्च १९३१ रोजी तेव्हा ठाणे आणि आता पालघर जिल्ह्य़ात असणाऱ्या तलासरी तालुक्यातील धामणगाव येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. बालवयातील हा आघात जिव्या मशे यांच्या जिव्हारी लागला. हळव्या आणि संवेदनशील मनाचे जिव्या त्यानंतर कित्येक वर्षे कुणाशीही बोलत नव्हते. आपल्या साऱ्या संवेदना आणि भावना ते चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करू लागले. वयाच्या ११व्या वर्षी ते डहाणू तालुक्यातील गंजाड येथे आले. रूढी, परंपरा, अंधश्रद्धांचा पगडा आणि अठराविशे दारिद्रय़ या दाहक वास्तवावर मात करून या कलासक्त व्यक्तिमत्त्वाने आपल्या समाजाच्या पारंपरिक कलेचा जीर्णोद्धार केला.
ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी पाडय़ावरील महिला लग्न समारंभात घराच्या भिंतींवर पारंपरिक वारली पद्धतीने चित्रे काढायच्या. त्याकाळी फक्त सुहासिनी महिलाच ही चित्रे काढीत. मात्र वयाच्या १३व्या वर्षी जिव्या मशे यांनी ही प्रथा मोडली. भिंतींवरील ही पारंपरिक सजावट त्यांनी कॅनव्हासवर आणली. त्या साध्या, सोप्या, मोजक्या रेषांच्या चित्रांमधून आदिवासींचे जीवन प्रतिबिंबित होत होते. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरातील पारंपरिक कलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली. आदिवासींची कला जगासमोर यावी, त्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, हा त्यामागचा हेतू होता. या मोहिमेतील भास्कर कुलकर्णी यांना जिव्या मशे हा अस्सल हिरा सापडला. त्यामुळे आदिवासी पाडय़ांवरील कला थेट दिल्लीत पोहोचली. १९७५ मध्ये मुंबईतील जहांगिर कला दालनात त्यांच्या वारली चित्रांचे प्रदर्शन भरले. पुढे अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, जपान, चीन आदी अनेक देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली.
जवळपास सहा दशकांहून अधिक काळ त्यांची चित्र साधना अखंडपणे सुरू होती. जगभरातील कलासक्त रसिकांच्या घरांची आणि कार्यालयांची शोभा त्यांच्या वारली चित्रांनी वाढवली. १९७६ मध्ये भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना पद्मश्रीही बहाल करण्यात आली. या कलेचा प्रसार व्हावा म्हणून राज्य शासनाच्या वतीने त्यांनी ठिकठिकाणी कार्यशाळाही घेतल्या. या कार्यशाळांद्वारे अनेक होतकरू चित्रकारांना त्यांनी वारली चित्रकलेचे धडे दिले.