वनस्पती जीवशास्त्राच्या मदतीनेही जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर मार्ग काढता येतो, हे वाचून आश्चर्य वाटेल, पण ते खरे आहे. यात वनस्पतींच्या कार्बन शोषून घेण्याच्या क्षमतेवर भर दिलेला असतो. जनुक वैज्ञानिक असलेल्या डॉ. जोआन कोरी यांनी यात मोठे काम केले आहे. त्यांना नुकताच ‘ग्रबर जेनेटिक्स पुरस्कार’ देण्यात आला.

वनस्पतींच्या विकासातील मूलभूत नियामक तसेच जैवरासायनिक प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला असून साल्क इन्स्टिटय़ूट फॉर बायॉलॉजिकल स्टडीज या संस्थेत त्या रेणवीय वनस्पती व पेशी जीवशास्त्र विभागाच्या संचालक म्हणून काम करतात. वनस्पती जीवशास्त्रात गेली अडीच दशके त्यांनी केलेले काम मानवतेला पुढे घेऊन जाणारे आहे त्यामुळेच त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. ‘हार्नेसिंग प्लांटस इनिशिएटिव्ह’ हा त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला संशोधन कार्यक्रम. हवामान बदल व तापमानवाढीच्या मुद्दय़ावर यातून त्या काम करीत आहेत.  कोरी यांचे वैशिष्टय़ म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाचा व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी केलेला उपयोग. वनस्पती प्रकाशाच्या माध्यमातून संप्रेरके निर्माण करतात. निसर्गत: कार्बन शोषण्याचे वैशिष्टय़ वनस्पतींमध्ये असते, पण अधिक प्रमाणात कार्बन शोषणाऱ्या आदर्श वनस्पती तयार करण्याचा उद्देश ‘हार्नेसिंग द प्लांटस इनिशिएटिव्ह’ प्रकल्पात आहे. त्यासाठी साल्क इन्स्टिटय़ूट येथे पृथ्वीच्या विविध भागांत असलेल्या हवामानाचे सादृश्यीकरण करण्याची यंत्रणा उभारली जात आहे. त्यामुळे कुठल्या हवामानात वनस्पतीत कुठले जनुकीय गुणधर्म निर्माण होतात याचा अभ्यास मोठय़ा प्रमाणावर शक्य होणार आहे. समुद्री शैवालाच्या परिसंस्थेचा अभ्यासही यात केला जात आहे. कोरी या साल्क इन्स्टिटय़ूटमध्ये प्राध्यापक तर आहेतच, शिवाय जगातील एक नामांकित वनस्पती जीवशास्त्रज्ञ आहेत. यूएस अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, जर्मन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या अनेक संस्थांच्या त्या सदस्य आहेत. कुमो सायन्स इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड, जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिका मेडल, सायंटिफिक अमेरिकन रीसर्च लीड इन अ‍ॅग्रिकल्चर असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड जास्त प्रमाणात शोषून घेणाऱ्या वनस्पती तयार करणे, दुष्काळ व पुरात टिकू शकतील अशा वनस्पतींची निर्मिती ही कोरी यांच्या संशोधनाची वैशिष्टय़े. आताच्या वीसपट अधिक कार्बन शोषणाऱ्या गवतासारख्या वनस्पतीची निर्मिती त्या करीत असून त्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स व दहा वर्षांचा कालावधी लागेल. कोरी यांनी काही वनस्पती सावलीत प्रकाशाशिवाय वाढवण्याचा मार्ग शोधला आहे.

Story img Loader