‘महाराष्ट्रात टिळक, राजवाडे यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवंतांची परंपरा नाहीशी होण्यास येथील शिक्षणपद्धती कारणीभूत असावी, कारण विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांना आपली जबाबदारी पेलता आली नाही..’ असे सुस्पष्ट विधान करून के. रं. शिरवाडकर गप्प बसले नाहीत. त्यांनी आयुष्यभर त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. ज्ञान देणे आणि घेणे यातील आनंद त्यांना भावत होता, त्यामुळे वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात शिरवाडकरांनी ठळकपणे लक्षात राहील एवढी मोठी झेप घेतली आणि महाराष्ट्राचे विचारविश्व अधिक समृद्ध केले. चर्चासत्रांत होणाऱ्या चर्चामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपली वैचारिक साधनसंपत्ती वाढवण्यावर त्यांनी भर दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाषा या विषयात त्यांनी अध्यापनाचे काम केले. ते विद्यार्थिप्रिय होते, याचे कारण विषय समजावून सांगण्यासाठी केवळ पाठय़पुस्तकांचा उपयोग त्यांनी केला नाही. संकल्पना समजावून सांगितल्या तर अनेक कूटप्रश्नांची उकल करणे शक्य होते, असे त्यांना वाटत असे. त्यातूनच त्यांनी लेखनाच्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आणि विविध विषयांवर सातत्याने अतिशय अर्थपूर्ण आणि ज्ञानपूर्ण लेखन केले. स्वातंत्र्य चळवळीपासून अनेक सामाजिक आंदोलनांतील सहभाग त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यास उपयोगी पडला. वैचारिक लेखनासाठी आवश्यक असणारी संशोधक वृत्ती आणि चिकाटी शिरवाडकरांच्या ठायी होती. त्यामुळे मार्क्सवादी साहित्यविचार, शेक्सपीअर, साहित्यातील विचारधारा, संस्कृती, समाज आणि साहित्य अशा अनेक विषयांचा धांडोळा त्यांनी अतिशय मन:पूत घेतला. विचारवंत म्हणून मिरवायची अजिबातच हौस नसल्याने आपले काम हाच आपला आरसा, असे त्यांच्या जगण्याचे सार. ते शांत, मृदू आणि मितभाषी होतेच, पण त्यांच्या लेखनातही त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा किंवा एकारलेपणा येऊ दिला नाही. वि. वा. शिरवाडकर हे त्यांचे बंधू. त्यांचे जीवन आणि साहित्य या अनुषंगाने ‘तो प्रवास सुंदर होता’ हे पुस्तक त्यांनी लिहिले; पण त्याबरोबरच लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्या’बद्दलही त्यांचे कुतूहल त्यांनी पुस्तकरूपाने व्यक्त केले.
‘आपले विचारविश्व’ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे मराठीमध्ये अलीकडील काळात प्रकाशित झालेले एक अतिशय महत्त्वाचे वैचारिक लेखन आहे. भारतीय विचारांच्या संदर्भात जगातील महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचे परिशीलन करणारा हा ग्रंथ मराठीत एक मैलाचा दगड बनला आहे. शिरवाडकरांच्या मते, ‘माणसाने अनेक आश्चर्यकारक गोष्टी निर्माण केल्या, पण या सर्वाच्या एकत्रित आश्चर्यापेक्षा अधिक नवलाचे असे त्याचे कार्य म्हणजे त्याने विचारांच्या शाश्वत वसाहती वसवल्या.’ या वसाहतींचा शोध त्यांनी घेतला, हे मराठी वाचकांसाठी एक अतिशय अर्थपूर्ण काम आहे, यात शंकाच नाही. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर काळातील एका महत्त्वाच्या संशोधकास महाराष्ट्र मुकला आहे.