‘भिकाऱ्याच्या वाडग्यात वसंत ऋ तू कसा उतरतो हे पाहिले आहे कधी?’, ‘गेलेले माणूस नसण्याचा वास’ किंवा ‘स्पर्शातल्या एकटेपणालाच कवचासारखे धारण करणे’ यांसारख्या प्रतिमा सहजपणे वाचकापर्यंत नेऊन भिडवणारे कवी केदारनाथ सिंह. ग्रामीण जीवन आणि शहरी जगणे यांचे संदर्भ त्यांच्यापूर्वीही अनेकांच्या काव्यांत आले; पण खेडे कालचे आणि शहर आजचे असे न मानता- ‘खेडेसुद्धा आजचेच’ म्हणून ग्रामीण वास्तवाकडे पाहणारे, हे वास्तव पागोटे घालून शहरातुद्धा कसे समोरच दिसू शकते याचेही भान असलेले केदारनाथ सिंह. ते ८३ वर्षांचे होते, सोमवारी गेले. अर्थातच सुगंध मागे ठेवून गेले. या सुगंधात आजच्या- आजही लागू असलेल्या मानवी जीवनाविषयीचे चिंतन आहे..
त्यांच्या कवितेत निसर्ग भरपूर आहे. पण तो कवितेत निव्वळ ‘वर्णन’ म्हणून येत नाही. त्याची प्रतिमा होते. ती अन्य कशाबद्दल काही तरी सांगते. काय असते हे अन्य काही? थोडक्यात उत्तर : ‘आजचे जगणे’. पण आजचे म्हणजे कधीचे? कदाचित १९४७ पासूनचे. कदाचित कालपासूनचेच. त्यांच्या एका जुन्या कवितेत शेतकरी बाप आपल्या पोराला सांगतो, कोल्हेकुई बऱ्याच रात्री ऐकूच आली नाही, तर समज- ‘बुरे दिन आनेवाले है’! अशा ओळी आज माध्यमस्वातंत्र्याला ‘कोल्हेकुई’ मानणाऱ्यांनी वाचल्या, तर ते जगणे उद्याचेही असू शकते.
केदारनाथ हे उत्तरप्रदेशच्या बलिया जिल्ह्य़ातील चकियाचे. जन्म १९३४ चा. १९५६ साली बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये एमए आणि १९६४ साली पीएचडी झाले. दरम्यान काव्यलेखनाची सुरुवात झालीच होती. लयदार गीतांनी केदारनाथांचे नाव होऊ लागले होते. गंगेकाठच्या त्या विद्यापीठात शिकत असताना कवी ‘अज्ञेय’ यांना कविता आवडल्याचे निमित्त; केदारनाथ हे आजन्म कवीच राहण्यासाठी पुरेसे होते. ‘अज्ञेय’-संपादित ‘तीसरा सप्तक’ (१९५९) संग्रहात केदारनाथ यांच्या तेवीस कविता आल्या. हा पहिला गौरव. ज्ञानपीठ (२०१३), साहित्य अकादमी (१९८९) यांच्या किती तरी आधीचा. साधारणपणे हिंदीतील प्रयोगवादी कवींमध्ये त्यांचा समावेश होत असला तरी त्यांची कविता अजिबात तर्ककठोर वा स्वप्नाळूही होत नाही.
‘जेएनयू’वाले होते केदारनाथ सिंह. तिथल्या हिन्दी विभागाचे प्रमुख. जेएनयूत सर्व भिंतींना लाल विटा आहेत, पण केदारनाथ तिथल्या वृक्षांचा हिरवा, आकाशाचा निळा, मातीचा करपट रंग पाहत- ही रंग पाहण्याची सवय त्यांनी नेहरूकालीन बनारसमध्ये कमावलेली होती. ‘अभी बिल्कुल अभी’, ‘जमीन पक रही है’, ‘बाघ’, ‘अकाल में सारस’, ‘तालस्ताय और साइकिल’, ‘सृष्टि पर पहरा’ हे कवितासंग्रह आणि ‘कल्पना और छायावाद’, ‘आधुनिक हिंदी कविता में बिंबविधान’, ‘मेरे समय के शब्द’ यांसारखे समीक्षाग्रंथ लिहिणाऱ्या केदारनाथांनी कार्यकर्तेगिरीत अनियतकालिकेही काढली होती. हिंदीसह अन्य भाषांवरही त्यांनी प्रेम केले, पण त्यांचे रवीशकुमारसारखे वारसदार हिंदीतच आहेत.