एक थोराड कुत्रा, पण मुलखाचा भित्रा. तरीही करतो करामती, गुंग होते साऱ्यांची मती.. ‘स्कूबी डू’ ही सचेतपट (अॅनिमेशन) मालिका ज्यांनी पाहिली असेल, त्यांना हे वर्णन नक्कीच पटेल. ग्रेट डेनसारख्या जातीचा हा भित्रा कुत्रा आणि त्याच्या करामती यांनी आबालवृद्धांना गुंग करण्याचे श्रेय ज्यो रूबी आणि केन स्पिअर्स यांचे होते. १९६९ मध्ये अमेरिकेतील चित्रवाणीवर सुरू झालेली ही ‘स्कूबी डू’ मालिका भारतात १९९९ मध्येही लोकप्रिय होती. ‘स्कूबी डू’च्या जनकांपैकी रूबी हे २६ ऑगस्ट २०२० रोजी वारले आणि ६ नोव्हेंबरला स्पिअर्स यांचेही निधन झाले. या दोघांनी ‘आर-एस प्रॉडक्शन’ नावाची कंपनीही काढली होती. पण सुरुवात झाली ती ‘टॉम अॅण्ड जेरी’ या अजरामर सचेतपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘हॅना बार्बरा स्टुडिओ’मध्ये केन स्पिअर्स नोकरीला होते तेव्हा! तरुण वय, त्यामुळे पडेल ते काम झटपट शिकून घेण्याची तयारी, या गुणावर ते पुढे सचेतपटकार झाले. स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली. ‘स्कूबी डू, व्हेअर आर यू’ या शीर्षकगीतापासून अनेक प्रकारची जबाबदारी स्पिअर्स यांनी सांभाळली. ‘कालयंत्रा’सारखे यंत्र स्कूबीला शक्ती देते, ही कल्पनाही त्यांची होती. ८२ वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून केन स्पिअर्स गेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा