इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या कंपन्यांमध्ये दक्षिण कोरियाची एलजी कंपनी अग्रेसरआहे. ही सुरूवातीला अगदी छोटी कंपनी होती, पण तिला नावारूपाला आणण्याचे काम कु बोन मु यांनी केले. लोकांचे आयुष्य या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी बदलून टाकले. या कंपनीचे घोषवाक्यही ‘लाइफ इज गुड’ असेच आशावादी आहे. एलजी कंपनीचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मो यांचे नुकतेच निधन झाले. उद्योगात कुठलीही संधी गमावता कामा नये व बदलास सामोरे जाताना त्यात कच खाता कामा नये, असा संदेश त्यांनी नुकताच एलजीच्या वर्धापनदिनानिमित्ताने दिला होता. आजच्या काळात उद्योगांचे जग फार स्पर्धात्मक झाले आहे. पूर्वीच्याच यशावर सगळे आयुष्य काढण्याचे हे दिवस नाहीत, त्यामुळे आत्मसंतुष्ट  राहता कामा नये, सतत नावीन्याचा शोध घेतला पाहिजे हा त्यांनी दिलेला कानमंत्रही तितकाच अर्थपूर्ण. कु यांचा जन्म साउथ गेआँगसाँग प्रांतात जिंजू येथे झाला. त्यांचे शिक्षण योनसेई विद्यापीठात झाले व नंतर त्यांनी अ‍ॅशलँड विद्यापीठातून पदवी घेतली. क्लीव्हलँड  स्टेट युनिव्हर्सिटीतून त्यांनी उद्योग व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली होती. १९७५ मध्ये त्यांनी एलजी कंपनीत प्रवेश केला. कु कुटुंबाच्या मालकीची ही कंपनी असली तरी वारसदाराला व्यवस्थापकीय प्रशिक्षण चुकत नसे, ते त्यांनी घेतले. सुरूवातीला ते कंपनीच्या एका रासायनिक फर्ममध्ये काम करीत होते. नंतर ते एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक झाले, नंतर १९८५ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले. तंत्रज्ञान संशोधन व विकास यावर त्यांनी नेहमी भर दिला. एलजी कंपनीचे नाव ‘लकी’ ही रासायनिक कंपनी व ‘गोल्ड स्टार’ ही इलेक्ट्रॉनिक कंपनी यांच्या आद्याक्षरातून ‘एलजी’ असे करण्यात आले. या दोन्ही कंपन्या एकाच समूहाच्या होत्या. नावात काय असते म्हणतात, पण नंतर एलजी हे नाव सर्वतोमुखी झाले. एलजी केमने कोरियात प्रथम लिथियम आयन बॅटरी तयार केली. अनेक मोटार कंपन्यांना या बॅटरी पुरवल्या जातात. ब्रिटनमध्ये भेट दिली असताना कु यांना पुनर्भारणाच्या बॅटरीची कल्पना पुढे न्यावीशी वाटली पण त्यात कंपनीला १८५ अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. पण ते डगमगले नाहीत, इलेक्ट्रॉनिक चिप्सच्या उद्योगातही त्यांनी उडी घेतली. आता सॅमसंगनंतर मेमरी चिप क्षेत्रात एलजी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या काळात कंपनीची आर्थिक वाढ मोठय़ा प्रमाणात झाली. एलजी समूहाचे मागोक डॉग या पश्चिम सेऊलमधील भागात ४२ एकरांवर सायन्स पार्क असून तेथे कंपनीच्या प्रयोगशाळा आहेत. एकूणच २३ वर्षे नेतृत्व करून  इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात कंपनीला पुढे नेण्यात कु यांचा मोठा वाटा होता यात शंका नाही.

Story img Loader