‘संपूर्ण आयुष्यभर लढण्याचे काम केले आहे. पुन्हा सीमेवर बोलावले तर आजही लढायला तयार आहोत..’ लोंगेवाला चौकीवरील लढाईचे नायक ब्रिगेडिअर (निवृत्त) कुलदीप सिंग चांदपुरी यांनी मागील वर्षी व्यक्त केलेली प्रतिक्रिया त्यांच्या लढाऊ बाण्याची साक्ष देण्यास पुरेशी आहे. भारत-पाकिस्तानमध्ये आजवर झालेल्या युद्धांपैकी १९७१ च्या युद्धाचे स्वरूप वेगळे होते. त्यात या योद्धय़ाची कामगिरी विलक्षण ठरली.
हे युद्ध एकाच वेळी दोन सीमांवर लढले गेले. भारताने पूर्व पाकिस्तानवर हल्ला चढविल्यास पाकिस्तान पंजाब, काश्मीरवर आक्रमण करणार हे अभिप्रेतच होते. पाकिस्तानच्या तावडीतून पूर्व पाकिस्तानला वेगळे करताना पश्चिमी सीमेवर पाकिस्तानी सैन्याला थोपवण्याची रणनीती आखण्यात आली. शेकडो पाकिस्तानी सैनिकांनी ३५ रणगाडय़ांच्या मदतीने राजस्थानच्या वाळवंटातील लोंगेवाला या भारतीय सैन्याच्या चौकीवर हल्ला चढविला. तिची जबाबदारी पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या तुकडीचे नेतृत्व करणारे कुलदीप सिंग यांच्याकडे होती. केवळ १२० जवानांच्या बळावर त्यांनी रात्रभर कडवी झुंज देत पाकिस्तानी सैन्याला रोखून धरले. सकाळी हवाई दलाची रसद मिळाल्यावर पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी फत्ते करण्यात आली. समोर मृत्यू दिसत असताना चौकीवरील एकही जवान मागे हटला नाही. युद्धातील कामगिरीबद्दल कुलदीप सिंग यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून त्या दृष्टीने तयारी सुरू केली. पदवी संपादित केल्यावर चेन्नईच्या लष्करी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीतील शिक्षण पूर्ण केले आणि १९६३ मध्ये ते पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियनमध्ये दाखल झाले. लष्करात अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. संयुक्त राष्ट्र संघाच्या आपत्कालीन सैन्य दलातही काम केले. लष्करी सेवेतील योगदानाबद्दल त्यांचा परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मान करण्यात आला. राजस्थान सीमेवर लोंगेवाला चौकी आहे. काही वर्षांपासून ही चौकी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना कुलदीप सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी दाखविलेल्या शौर्याची माहिती अवगत करण्यात येते. कोणाही भारतीयाचा ऊर भरून येणे त्यामुळे साहजिकच आहे. कुलदीप सिंग यांचा पराक्रम ते आज जरी आपल्यात नसले तरी सर्वानाच प्रेरक राहील.