अमेरिकेत १९६०च्या दशकात झालेल्या भयंकर वांशिक दंगलींचा आढावा घेण्यासाठी तेथे केर्नर आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने काही निष्कर्ष काढले. आफ्रिकन अमेरिकनांची सर्वच क्षेत्रांमध्ये होत असलेली मुस्कटदाबी आणि अवहेलना हे या दंगलींमागील एक कारण होते; पण केर्नर आयोगाने आणखी एका महत्त्वाच्या मुद्दय़ावर बोट ठेवले. वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे या समाजाविषयीचे अज्ञान आणि अनास्था, कारण या बहुतेक माध्यमांमध्ये आफ्रिकन अमेरिकनांना असलेले अत्यल्प प्रतिनिधित्व. त्या निष्कर्षांची दखल घेऊन ‘न्यूजडे’ या वृत्तपत्राने व्हिएतनामवारी करून आलेल्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याला कामावर दाखल करून घेतले. तो आफ्रिकन अमेरिकन होता आणि इंग्रजी उत्तम लिहू शकत असे. त्याचे नाव लेस पेन. त्या घटनेला जवळपास ५० वर्षे लोटली. या लेस पेन यांचे नुकतेच निधन झाले; पण गोऱ्यांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकी पत्रकारितेच्या क्षेत्रात आफ्रिकन अमेरिकनांविषयी जाणिवा समृद्ध करण्याचे महत्कार्य पुलित्झरविजेत्या या पत्रकाराने करून दाखवले.

त्या दंगलींचा आणि त्या काळात अमेरिकेतील बहुतेक भागांमध्ये प्रचलित असलेल्या वातावरणाचा मोठा प्रभाव पेन यांच्यावर होता. रोखठोक आणि निर्भीड लिखाण, प्रत्येक घटनेच्या आणि संकल्पनेच्या मुळाशी जाण्यासाठी सत्ये आणि समजुती खणून काढण्याची अथक प्रवृत्ती त्यांच्या पत्रकारितेच्या केंद्रस्थानी होती. अमेरिकेतील आणि एकूणच पाश्चिमात्य पत्रकारितेवर गोऱ्यांच्या दृष्टिकोनाची घट्ट पकड होती. ती सोडवून-मोडून काढण्यासाठी लेस पेन आघाडीवर राहिले. हे करताना निष्कारण अभिनिवेश, वंचितांचे वाली वगैरे भूमिकांपासून ते कटाक्षाने दूर राहिले. उलट न्यूयॉर्कमधील लाँग आयलंडपुरत्या मर्यादित असलेल्या ‘न्यूजडे’च्या कक्षा आणि व्याप्ती वाढवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आपला कोणी बॉस नाही आणि आपण कुणाचे बॉस नाही, असाच त्यांचा वावर राहिला. तो गोऱ्या संपादकीय मंडळाने आणि व्यवस्थापनाने खपवून घेतला, याचे एक कारण म्हणजे लेस पेन यांची पत्रकारिता.

वर्णद्वेष किंवा वंशद्वेष हे केवळ दक्षिण आफ्रिकेच्या सरकारची मक्तेदारी नाही. ते राष्ट्रीय पक्षांच्या धोरणांपुरते मर्यादित नसते. तो तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्यातून दिसतो. तुमच्या समाजात, घराबाहेर, बाजारात असतो. अन्याय घर, चर्च, शाळा, विद्यापीठे येथेही घडत असतो. त्याचा मुकाबला करायला हवा, हे लेस पेन यांनी आपल्या रिपोर्ताजमधून, बातम्यांतून, लेखांतून वाचकांच्या मनात ठसवले. त्यांचा वाचक केवळ गौरेतर नव्हता. त्यातून गोऱ्यांचेही प्रबोधन, मनपरिवर्तन होत गेले. तुर्कस्तानमधील अफूच्या शेतीचा प्रवास अमेरिकेतील गल्ल्यांपर्यंत कसा येतो याविषयी त्यांनी केलेल्या शोधपत्रकारितेबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना १९७४ मध्ये पुलित्झर पारितोषिक मिळाले. त्यातून त्या पारितोषिकाचाही सन्मान झाला असे म्हणावे लागेल. बॉक्सर मोहम्मद अली यांच्याइतकेच लेस पेन यांनाही आफ्रिकन अमेरिकनांचे आत्मभान जागृत ठेवण्याचे श्रेय द्यावे लागेल.

Story img Loader