स्त्रीच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार, हा आशा बगेंच्या लेखनाचा स्थायिभाव आहे. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांतील अनुभवविश्व मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारे असले तरी त्याची मांडणी वेधक व विचार करायला भाग पाडणारी असते. मराठीतील आघाडीच्या कथाकार अशी ओळख असलेल्या बगेंना राम शेवाळकरांच्या नावाने सुरू झालेला पहिलाच ‘साहित्यव्रती’ पुरस्कार मिळणे हा त्यांच्या दीर्घ लेखनकारकीर्दीचा यथोचित गौरवच होय.
आशा बगे या मूळच्या नागपूरच्या. मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बगेंनी कधीही नोकरीचा विचार केला नाही. घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासणाऱ्या आशाताईंची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.
त्यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला. एवढे मानसन्मान मिळूनसुद्धा त्यांचा साहित्य वर्तुळातील वावर कमीच राहिला. या वर्तुळात चालणाऱ्या राजकारणापासून त्यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले. विदर्भ साहित्य संघाने पहिल्यांदा लोखिका संमेलन घेतले तेव्हा त्यांनी अगदी आनंदाने अध्यक्षपद स्वीकारले. ‘अ. भा.’साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नेहमीच नकार दिला. लेखन व संगीत हीच माझी साधना आहे, त्यात रमू द्या, असे त्या नकार देताना नम्रपणे सांगतात.
कायम आनंदी, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणाऱ्या आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे. सध्या त्या वामनराव चोरघडेंच्या निवडक कथांचे संपादन करत आहेत. शिवाय त्यांच्या दोन कादंबऱ्या येत्या काळात प्रसिद्ध होणार आहेत.