गोव्याच्या नितांतसुंदर भूमीत अनेक नररत्ने जन्माला आली, ज्यांनी विविध क्षेत्रे आपल्या कार्याच्या दीप्तीने झळाळून सोडली. अशांपैकी एक भिकू पै आंगले. गोव्यात जन्मलेले भिकूबाब शिक्षणाकरिता मुंबईत आले आणि मग शैक्षणिक क्षेत्र हीच त्यांनी आपली कर्मभूमी निवडली. जगाच्या कानाकोपऱ्यांत विखुरलेले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने चमकणारे अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. विद्यार्थ्यांवर केवळ शैक्षणिक संस्कार न करता त्यांनी नैतिकता आणि तत्त्वनिष्ठेचे बीजही त्यांच्यात रुजवले. गोव्याच्या भूमीतले नाटय़वेड ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’च्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या रूपात त्यांनी वृद्धिंगत केले. नाशिकला प्राचार्य असताना त्यांचा नाटककार वसंत कानेटकर यांच्याशी स्नेह जुळला. तोवर ‘पीडीए’साठी नाटके लिहिणाऱ्या कानेटकरांना त्यांनी ‘गोवा हिंदु’साठी नाटक लिहिण्याची गळ घातली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्याचेच फलित. पुढे ‘गोवा हिंदु’साठी कानेटकरांनी अनेक नाटके लिहिली. भिकूबाबनी वि. वा. शिरवाडकरांनाही ‘गोवा हिंदु’त नाटककार म्हणून आणले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘सं. मत्स्यगंधा’ आदी नाटकांतून भिकूबाबनी साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली. राज्य नाटय़स्पर्धेत ‘खडाष्टक’मध्ये, तसेच ‘लेकुरे उदंड जाली’सारख्या नाटकांतून त्यांनी भूमिकाही केल्या. नाटकातील बदली कलाकारांच्या तालमी घेण्यात ते माहीर होते. एका अर्थाने तालीम मास्तरच म्हणा ना! नाशिकहून नाटकांच्या प्रयोगासाठी ये-जा करताना त्यांनी संस्थेकडून एक पैसाही कधी घेतला नाही.
एका नाटय़स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम करत असताना त्यांना एका वर्तमानपत्राने त्याबद्दल लिहायला सांगितले. ते लेखन वाचकांना एवढे आवडले, की पुढे त्यांनी मराठी आणि इंग्रजीत अनेक पुस्तके लिहिली. ‘दंश’, ‘मराठी रंगभूमी’, ‘रंगगंध’ ही त्यांतील काही. सुंदर हस्ताक्षर आणि भाषेवरील प्रभुत्व ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टय़े. ‘वळून बघता मागे’ हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहेच, खेरीज शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवांवर आधारित ‘स्पर्श होता परिसाचा’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले. ८० साली ते आपल्या मायभूमीत.. गोव्यात परतले. गोव्याच्या कोकणी-मराठी वादात त्यांनी हिरिरीने मराठीचा पुरस्कार केला. आपल्या गोंयकार सुहृदांचा रोषही त्यांनी त्यास्तव पत्करला. एखाद्या विषयावरील आपली ठाम मते मांडताना त्यांनी कधीच कुणाची भीडभाड बाळगली नाही. कमालीचे स्पष्टवक्ते व फटकळ म्हणून जरी त्यांची ख्याती असली तरी त्यांच्या उपजत विनोदी स्वभावामुळे त्यांच्याकडे माणसे आकर्षिली जात. गोव्यातल्या जत्रोत्सवांमध्ये नाटके बसवण्याचा त्यांना छंद होता. त्याकरिता त्यात काम करणाऱ्यांच्या कार्यशाळा घेण्यापासून सगळी उस्तवार ते करायचे. शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रांत जागल्याची भूमिका त्यांनी आयुष्यभर इमानेइतबारे निभावली. नव्वदीपार प्रदीर्घ, समृद्ध आणि सळसळते आयुष्य ते जगले.