नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची या पदावर फेरनिवड झाली आहे.  समाजातील सर्व घटकांमध्ये समानता असावी. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आर्थिक या अत्यावश्यक बाबी सर्वाकडे असाव्यात. मात्र, समाजातील परिस्थिती याविरोधी असल्याची जाणीव झाल्यानंतर विद्या देवीत्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने विचार करू लागल्या. या तळमळीतूनच त्यांनी विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी होऊन काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर लढा दिला. १९७९ मध्ये ‘वाम’ आघाडीच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नांवरच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर नेपाळ कम्युनिस्ट पक्ष युनिफाइड मार्क्‍सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) या पक्षाच्या त्या सदस्या बनल्या.

१९९४ आणि १९९९ या दोन्ही वेळी त्यांनी संसदीय निवडणुकीत विजय मिळविला. १९९३ मध्ये पती आणि प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते मदन कुमार भंडारी यांचे अपघाती निधन झाल्यानंतरही विद्या देवी यांनी जनतेच्या प्रति असलेल्या कर्तव्याचा त्याग केला नाही. पतीच्या मृत्यूनंतर नेपाळमध्ये विधवा महिलांना सामाजिक जीवनात सहभागी होणे अत्यंत कठीण असते. मात्र, विद्यादेवी यांनी या रूढी-परंपरांना तिलांजली देत विजय मिळवून संसदेत प्रवेश केला होता. त्यांचे वडील भोजपूर येथे एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे आजोबा सामाजिक कार्यात अग्रेसर होते. कौटुंबिक पाश्र्वभूमी भक्कम असल्याने विद्यादेवी यांना मुलगी असून बालपणी कोणत्या भेदभावाचा सामना करावा लागला नाही. त्यांच्या परिवारातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्याकडे पाहूनच त्यांच्या गावातील इतरांनी मुलींना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली होती.

संसद सदस्य झाल्यानंतर तीन वर्षांनंतर विद्या देवी यांना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आले. मात्र, केवळ महिला मंत्री असल्याने त्यांना इतरांकडून सहकार्य मिळत नव्हते. केवळ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळीच नाही तर पक्षाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही विद्यादेवी यांना स्वपक्षीयांनीच विरोध केला होता. नेपाळमध्ये एका महिलेला अशा प्रकारे विरोध केला जात असतानाही विद्या देवी यांनी राष्ट्रपती पदावर दुसऱ्यांदा विराजमान होणे ही निश्चितच या देशातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी बाब आहे.

विद्यादेवी या दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान होणे भारतासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण त्यांच्या काळातच भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली आहे. त्यांची ही फेरनिवड भारत आणि नेपाळसाठी अनेक चांगल्या बाबींची नांदी ठरेल अशी अपेक्षा आहे.

Story img Loader