ऐंशी-नव्वदच्या दशकांत एकांकिका, राज्य नाटय़स्पर्धेसह प्रायोगिक तसेच मुख्य धारा रंगभूमी, चित्रपट, टीव्हीचा छोटा पडदा असा चौफेर अन् यशस्वीरीत्या मुक्त संचार करणाऱ्या दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार व अभिनेते दिलीप कोल्हटकर यांचे वयोमानानुसार जाणे हेदेखील नाटय़सृष्टी व रसिकांसाठी  चटका लावून जाणारेच आहे. ज्याकाळी व्यावसायिक रंगभूमी हाच आपल्यातला हुन्नर आणि प्रतिभा दाखविण्याचा एकमेव मार्ग होता अशा काळात दिलीप कोल्हटकरांनी त्यावर अधिराज्य गाजवले. नाटककार बाळ  कोल्हटकर आणि नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांच्यासारख्या तालेवार रंगकर्मीचा घराण्यातूनच वारसा लाभला असला तरी त्यांच्या पुण्याईवर दिलीप कोल्हटकर कधीच विसंबले नाहीत. त्यांचे झळझळीत नाटय़कर्तृत्व हे स्वयंप्रकाशित होते. बँकेतील नोकरीमुळे आंतर-बँक नाटय़स्पर्धा, एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, राज्य नाटय़स्पर्धा ते व्यावसायिक रंगभूमी असा त्यांचा स्वाभाविक प्रवास घडला. आणि या प्रत्येक मंचावर त्यांनी आपल्या यशस्वी पाऊलखुणा उमटविल्या. ‘राजाचा खेळ’, ‘षड्ज’, ‘सप्तपुत्तुलिका’ यांसारखी वेगळ्या धाटणीची नाटके करणाऱ्या दिलीप कोल्हटकरांनी राज्य नाटय़स्पर्धेत ‘ययाति’ हे तब्बल सहा तासांचे, पाच अंकी नाटक सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती. आश्चर्य म्हणजे या नाटकाचे पाचही अंक वेगवेगळ्या नाटककारांचे होते. मूळ संस्कृत नाटकातील एक अंक, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘संगीत विद्याहरण’मधील एक अंक, वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाति आणि देवयानी’तील एक अंक, गिरीश कार्नाडांच्या ‘ययाति’मधील एक अंक आणि अच्युत वझे यांच्याकडून लिहून घेतलेला एक अंक असे एकूण पाच अंकी हे नाटक राज्य नाटय़स्पर्धेतील नियमांमुळे जरी बाद ठरले असले तरी एक आगळा ‘प्रयोग’ म्हणून ते अजूनही जाणकारांच्या स्मरणात आहे. ‘उभं दार, आडवं घर’मध्ये अशा तऱ्हेचा सेट त्यांनी तयार केला होता, की जो हळूहळू कोसळत असे. विजया मेहता यांच्या गाजलेल्या बहुतेक नाटकांची प्रकाशयोजना त्यांचीच आहे. नाटक कसे ‘दिसावे’ याचा विचार त्यांच्या प्रकाशयोजनेत असे.  विजयाबाईंच्या ‘शाकुंतल’मध्ये त्यांनी विदुषकाची भूमिका केली होती. तसेच ‘जास्वंदी’मधील त्यांची बोक्याची भूमिकाही गाजली. विजया मेहता आणि पं. सत्यदेव दुबे अशा परस्परविरोधी ‘स्कूल्स’चे ते विद्यार्थी होते. ‘मोरूची मावशी’, ‘आई रिटायर होतेय’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘छावा’, ‘आसू आणि हसू’ अशा भिन्न प्रकृतीच्या नाटकांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे, यातूनच त्यांची दिग्दर्शक म्हणून यत्ता किती उच्च दर्जाची होती हे कळून यावे. चित्रपट आणि टीव्हीचा पडदाही त्यांनी वर्ज्य मानला नाही. तिथेही आपला ठसा उमटवण्यात ते यशस्वी झाले. आणि एके दिवशी अकस्मात कलाक्षेत्रातून निवृत्ती घेऊन त्यांनी आपल्या गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ‘इदं न मम्’ वृत्तीने तो सहजगत्या पेललाही. प्रकाशझोतात राहण्याची सवय झालेल्याला अशा तऱ्हेने वानप्रस्थाश्रम स्वीकारणे क्वचितच जमते.  कोल्हटकर अशा दुर्मीळांतले एक होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा