पाकिस्तानातील लष्करशाहीला आणि लष्करी प्रभावाला सातत्याने विरोध करणाऱ्या पत्रकारांची, कार्यकर्त्यांची, विचारवंतांची संख्या त्या देशात थोडकी नाही. दक्षिण आशियातील इतर देशांपेक्षा या देशात व्यवस्थेशी आणि यंत्रणेशी लढण्यासाठी अधिक धाडस आणि सकारात्मकता लागते. पाकिस्तानी पत्रकार गुल बुखारी या अशा योद्धय़ांपैकी एक. परवा त्यांचे अचानक अपहरण झाल्यामुळे त्या चर्चेत आल्या. ‘वक्त न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील एका चर्चात्मक कार्यक्रमासाठी त्या लाहोरमधील स्टुडिओकडे निघाल्या होत्या, पण वाटेतच त्यांना काही जणांनी ताब्यात घेतले आणि काही तासांनी सोडून दिले. तोपर्यंत अर्थातच कार्यक्रम संपलेला होता. गुल यांना ताब्यात घेणारे साध्या वेशात होते, पण हा सारा प्रकार गणवेशधारी सैनिकांच्या ‘देखरेखी’खाली झाला! गुल या ‘द नेशन’ या पाकिस्तानातील एका जबाबदार दैनिकासाठी स्तंभलेखनही करतात. पाकिस्तानातील लष्करशाही आणि या लष्करशाहीची विशेषत: तेथील राजकीय वर्तुळात नेहमीच होत असलेली घुसखोरी आणि अरेरावी यावर गुल बुखारी सातत्याने प्रहार करतात. त्यामुळे अर्थातच त्या लष्कराच्या नावडत्या आहेत. त्यातच, त्या पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या समर्थक आहेत. याचा एक परिणाम असा झाला, की त्यांच्या झालेल्या पळवापळवीमुळे शरीफविरोधकांना सुप्त आनंद झाला आणि त्यामुळे पत्रकार आणि शरीफ समर्थकवगळता त्यांच्या बाजूने म्हणावा तसा आवाज उठवला गेला नाही.
याची फारशी फिकीर गुल बुखारी करतील, अशातलाही भाग नाही. काही महिन्यांपूर्वी कालवश झालेल्या पाकिस्तानच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां अस्मा जहांगीर किंवा ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्याप्रमाणेच गुल या पूर्वीपासूनच तेथील लष्करी राजवटीविषयी लिहीत आणि बोलत असतात. पाकिस्तानी पत्रकारांसाठी निर्भीड विचार मांडणे हे नेहमीच आव्हानात्मक ठरत आले. गेल्या एका वर्षांत त्या देशातील १५७ पत्रकारांना मारहाण, धमक्या, अपहरण, अवैध अटक आणि हत्या अशा संकटांना सामोरे जावे लागले होते. ३९ पत्रकारांना कोणतेही कारण न देता डांबून ठेवले गेले. यांतील पाच जणांची नंतर हत्याही झाली. गुल बुखारी यांना मंगळवारी काही वेळ ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेण्यात आले, त्या वेळी पाकिस्तानातील आणि बाहेरच्या पत्रकारांना त्यांच्या जीविताविषयी रास्त भीती वाटली होती. गुल बुखारी यांनी नंतर ट्वीट करून स्वत:ची खुशाली कळवली आणि आभारही मानले. पण प्रत्यक्ष घटनेविषयी त्या अद्याप काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे शरीफ सरकार आणि लष्कर यांच्यातील संघर्षांची त्या शिकार ठरल्या का, हेही स्पष्ट झालेले नाही.