कोणत्याही उद्योग, व्यवसायाची अधिक भरभराट करावयाची असल्यास ध्येय हे विशाल ठेवावे लागते. हे ध्येय साध्य करण्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. कठोर परिश्रम, चिकाटी आणि व्यावसायिक कौशल्याचा परिचय द्यावा लागतो. कुठे नमते घ्यावे आणि कुठे कठोरता ठेवावी हे शिकावे लागते. हेच नेमके करून दाखविले नाशिकच्या ‘सपट इंटरनॅशनल’चे अध्यक्ष जयंतभाई रामशंकर जोशी यांनी.
नाशिकला उद्योग, व्यवसायाच्या रूपाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे जे काही मोजके आहेत, त्यापैकी जयंतभाई हे एक होय. जयंतभाईंचे वडील रामशंकर जोशी यांनी १८९७ मध्ये सपट लोशन हे त्वचाविकारावरील मलम बाजारात आणून आपले वेगळेपण दाखविण्यास सुरुवात केली. पुढे औषध उत्पादनांच्या विक्रीसह १९०५ मध्ये त्यांनी सपट चहाच्या व्यवसायास सुरुवात केली. एका छोटय़ा दुकानात सुरू केलेला सपट चहाविक्रीचा व्यवसाय भविष्यात देशाच्या सीमा ओलांडेल, याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. अर्थात, हे सर्व घडले या व्यवसायाची धुरा १९५५ च्या सुमारास आपल्या खांद्यावर घेणाऱ्या जयंतभाईंमुळे. सुमारे १२० वर्षांची परंपरा असलेल्या सपट कंपनीच्या कार्यशैलीतील परिवर्तनासाठी जयंतभाईंनी सुरुवात केली. तोपर्यंत सपट चहाची विक्री खुल्या स्वरूपात केली जात होती. सपट चहाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त करून द्यावयाचे असल्यास त्यात काही आधुनिक पद्धतीचे बदल केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे जाणून जयंतभाईंनी खुल्या चहाविक्रीच्या व्यवसायाला औद्योगिक स्वरूप प्राप्त करून दिले. त्यांनी प्रथम खुल्या स्वरूपाचा चहा बंदिस्त करून विक्रीस सुरुवात केली. त्याचा अनुकूल परिणाम दिसून आला. त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला ओळख मिळवून दिली. जयंतभाईंच्या व्यावसायिक कौशल्यामुळे सपट चहा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. सपट चहासह त्यांची विविध औषधांची उत्पादनेही विकली जात आहेत. उद्योग व्यवसायात यश मिळविताना जयंतभाई यांनी सामाजिक जाणिवेतून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांतही महत्त्वपूर्ण योगदान दिले. आर. एच. सपट फाऊंडेशनच्या माध्यमातून जयंतभाईंनी उद्योग, व्यवसायापलीकडील वाट चोखाळली. विशेषत: शैक्षणिक क्षेत्राकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. फाऊंडेशनच्या माध्यमातून अपंग, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. सुमारे ५० वर्षांपूर्वी मर्सिडीज गाडीमधून फिरणाऱ्या जयंतभाईंनी आपल्या स्वभावातील मृदूपणा शेवटपर्यंत जपला. ‘जग्गूकाका’ म्हणूनच परिचित असलेल्या जयंतभाईंच्या निधनाने सामाजिक भान जपणारा उद्योगपती आपल्यातून निघून गेला आहे.