निझामशाहीतून १९४८ साली मराठवाडा मुक्त झाला तरी उच्च शिक्षणाच्या सोयी तिथे नव्हत्याच. तेथील तरुणांना हैदराबाद वा नागपूर येथेच उच्च शिक्षणासाठी जावे लागे. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या द्रष्टय़ा नेत्याच्या पुढाकारामुळे औरंगाबादेत आधी मिलिंद महाविद्यालय आणि नंतर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. मग अनेक महाविद्यालये सुरू झाली. प्रारंभीच्या काळात उच्चशिक्षित अध्यापकांची तशी तेथे वानवाच होती. यातून मग वा. ल. कुळकर्णी, यू. म. पठाण, द. मा. मिरासदार, राम शेवाळकर, गुरुराज अमूर, सुरेंद्र बारलिंगे, रा. ग. जाधव, स. रा. गाडगीळ असे नामांकित प्राध्यापक मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आदी भागांतून मराठवाडय़ात आले. त्यातीलच एक होते प्रा. म. द. पाध्ये! यातील काही जण नोकरी वा निवृत्तीनंतर पुन्हा आपापल्या भागांत गेले, पण पाध्ये मात्र मराठवाडय़ातच रमले.
ते मूळचे नागपूरचे. २ जानेवारी १९२६ हा त्यांचा जन्मदिन. वर्धा व नागपूर येथे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. प्रा. ठाकूरदास बंग यांचे ते विद्यार्थी असल्याने सुरुवातीपासूनच त्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा होता. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संपर्कात आले. त्यांनी पाध्ये यांना मराठवाडय़ात येण्याचा आग्रह धरला. स्वामीजींनीच स्थापन केलेल्या नांदेड व अंबाजोगाईच्या महाविद्यालयांत त्यांनी काही काळ अध्यापन केले. औरंगाबाद येथे विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर पाध्ये हे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात रुजू झाले. तेथे तीन दशके अध्यापन केल्यानंतर ते विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
समाजवादी विचारांची बांधिलकी मानणाऱ्या पाध्ये यांना आणीबाणीच्या काळात स्थानबद्ध करून नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. अत्यंत कडक शिस्तीचे प्राध्यापक म्हणून ते ओळखले जात. ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘साधना’चे ते खूप जुने वाचक होते. ‘एक्स्प्रेस’मधील महत्त्वाच्या लेखांची कात्रणे काढून ती जपून ठेवत. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना संदर्भासाठी ती कात्रणे ते उपलब्ध करून देत. मराठवाडय़ाच्या विकासाबद्दल आस्था असल्याने ते गोविंदभाई श्रॉफ व अनंतराव भालेराव यांच्या संपर्कात आले. मराठवाडय़ातील पाणी, शेती आदी प्रश्नांवर त्यांनी ‘मराठवाडा’ दैनिकात विपुल लेखन केले. काही वर्षे ते ‘मराठवाडा’ दैनिकाचे विश्वस्तही होते. ‘साधना’ तसेच ‘समाज प्रबोधन पत्रिके’तही त्यांनी प्रासंगिक लिखाण केले. त्यांच्या पत्नी सरकारी सेवेत होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांना मिळणारे निवृत्तिवेतन त्यांनी कुटुंबासाठी कधीही वापरले नाही. समाजात विधायक काम करणाऱ्या संस्थांना ती रक्कम ते देऊन टाकत. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातील अनेक संस्थांना त्यांनी मदत केली होती. पाध्ये हे महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष होते. वार्धक्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील मुलाकडे त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या निधनाने मराठवाडय़ाच्या विकासाची तळमळ असलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे.