भारत व पाकिस्तान यांच्यात अगदी सुरुवातीला म्हणजे १९४७ मध्ये श्रीनगर खोऱ्यात जे युद्ध झाले होते ते ऐतिहासिक असेच होते. कारण त्यामुळेच काश्मीर भारतात राहिला. या युद्धात मद्रास रेजिमेंटची बटालियन पहिल्यांदा तेथे गेली. या बटालियनमध्ये सहभागी असलेले व नंतर अनेक लष्करी मोहिमांचे साक्षीदार असलेले मेजर जनरल एस. पी. महादेवन यांचे नुकतेच निधन झाले. काश्मीरचे राजे हरिसिंग यांच्या मदतीसाठी भारतीय सैन्य पाठवण्याचा आदेश त्या वेळी वल्लभभाई पटेल यांनी दिला होता. त्या मोहिमेतील महादेवन हे एक बिनीचे शिलेदार. ते मूळ तामिळनाडूतील पलानीचे. त्यांचा लष्करात प्रवेश झाला ते वर्ष होते १९४६. बेंगळूरुच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये महादेवन यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले होते. कोलकाता येथे ज्या हिंदू-मुस्लीम दंगली त्या वेळी उसळल्या होत्या, त्यात महात्मा गांधींचे रक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.

बांगलादेश युद्धात लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांनी पाकिस्तानची मोठी दाणादाण उडवली होती. त्या वेळीही त्या मोहिमेत महादेवन यांचा सक्रिय सहभाग होता. १९७२ मध्ये वयाची ४७ वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच ते मेजर जनरल या हुद्दय़ावर पोहोचले होते. बांगलादेश युद्धातील कामगिरीसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल मिळाले.  त्यांनी आंध्र प्रदेशातील १९७८ मध्ये झालेल्या वादळात मदतकार्याची मोहीम यशस्वी पार पाडली होती.सत्यसाईबाबा संस्थेचे ते अध्यक्ष राहिले. त्यातही त्यांनी वैद्यकीय शिबिरे, जलप्रकल्प, झोपडपट्टी स्वच्छता यांसारखे उपक्रम राबवले. १९७२ मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये द्रास, कारगिल, चोरबटला, तुरतुक येथे घुसखोरी केली होती. चीनने चुशील व काराकोरम भागात अशीच आगळीक केली होती. त्या वेळी कुठलीही प्राणहानी न होता त्यांनी ही घुसखोरी दूर केली होती. काँगोतील शांतता मोहिमेत सहभागी असताना गोळीबारातून ते बचावले होते. तेथे असताना त्यांनी बेल्जियम भाडोत्री सैनिकांच्या तावडीतून एक पूल ताब्यात घेतला होता. त्यात ते जखमी झाले, ती बातमी कुटुंबाला कळून मनस्ताप होऊ नये यासाठी त्यांनी मानपत्र नाकारले होते. बांगलादेश युद्धाच्या वेळी पूर्व पाकिस्तानात जेसोरे येथे अ‍ॅलॉट हेलिकॉप्टर चालवीत असताना खालून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. त्यात हेलिकॉप्टरला खालून छिद्र पडले पण ते वाचले. तीही साहसी मोहीम होती. चीन सीमेवर काराकोरम खिंडीला भेट दिल्यानंतर प्रतिकूल हवामानामुळे ते त्यांच्या छावणीकडे हेलिकॉप्टरने येत असताना धोक्याची स्थिती होती, परंतु त्यातही ते सुखरूप लेहच्या मुख्यालयात पोहोचले. सैन्यदलात नव्याने येणाऱ्यांसाठी त्यांची शौर्यगाथा अनुकरणीच राहील.

Story img Loader