स्तनाचा कर्करोग हा विषाणूंमुळे होतो असा पूर्वी एक समज होता, त्या वेळी अर्थातच डीएनए क्रमवारीचे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. अशा परिस्थितीतही अमेरिकेतील एका महिला वैज्ञानिकाने मात्र स्तनाचा कर्करोग आनुवंशिकता म्हणजे जनुकांशी संबंधित असल्याचे विधान केले होते, निव्वळ हा अंदाज बांधून त्या थांबल्या नाहीत तर स्तनाचा कर्करोग कोणत्या जनुकीय दोषामुळे होतो हेही त्यांनी त्यांच्या संशोधनातून दाखवून दिले. त्यांचे नाव डॉ. मेरी क्लेअर किंग. त्यांना नुकताच इस्रायलचा प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर झाला आहे. जनुकीय उत्परिवर्तनाचा स्तनाच्या कर्करोगाशी खूप जवळचा संबंध असतो हे त्यांनी दाखवून दिले.
सध्या त्या वॉशिंग्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. स्तनाचा कर्करोग जनुकांमुळे होतो हे दाखवण्यासाठी गणितीय प्रारूप त्यांनी तयार केले. त्यासाठी त्यांना पंधरा वर्षे लागली होती. १९९० मध्ये त्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्तनाच्या कर्करोगास कारण ठरणाऱ्या ब्रॅका १ (बीआरसीए) जनुकाचा शोध घेतला. स्तनाच्या कर्करोगाचा जनुक अशीच नंतर या जनुकाची ओळख ठरली. गेल्या वर्षी त्या भारतात आल्या होत्या त्या वेळी त्यांनी जे काही सांगितले त्यानुसार दिवसेंदिवस शहरी भागात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्या मते भारतच नव्हे तर जगात सर्वत्र हेच निरीक्षण सामोरे येत आहे, याचे कारण स्तनाचा कर्करोग हा संपन्नतेचा शाप आहे. याचे कारण आता महिला शिकल्या आहेत, त्या त्यांचे कुटुंब उशिरा सुरू करतात. पण मुलींना काही संपन्न कुटुंबात चांगले पोषण मिळते, त्यामुळे पाळी लवकर येते. पाळी येणे व कुटुंब सुरू होणे याच्या मधला काळ वाढला आहे. पाळी व पहिले मूल होणे यामध्ये पूर्वीचा जो काळ होता त्यात आता तीन ते चार पटींनी वाढ झाली आहे. हा कालावधी जेवढा जास्त तेवढी स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढते. त्यांच्या मते वयाच्या तिशीनंतर महिलांनी जनुकीय तपासणी करून घेणे हा त्यावरचा सर्वात योग्य मार्ग आहे. मेरी क्लेअर या वैज्ञानिक असल्या तरी मानवी हक्क, सामाजिक प्रश्न यातही त्या नेहमीच सहभागी असतात. चार दशकांपूर्वी जेव्हा विज्ञान संशोधनात महिलांचे फारसे स्थान नव्हते तेव्हा त्यांनी त्यात प्रवेश केला. त्यांचा जन्म शिकागोतील इव्हान्सट्न उपनगरातला. कार्लटन महाविद्यालयातून गणितात पदवी घेतल्यानंतर त्या सांख्यिकीतील डॉक्टरेटसाठी बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात आल्या. गणिताच्या माध्यमातून जनुकीय समस्या सोडवण्यात त्यांना नंतर रस वाटू लागला, १९६७ मध्ये त्या प्रायोगिक जीवशास्त्राकडे वळल्या. सामाजिक जाणिवा असलेल्या अपवादात्मक वैज्ञानिकांमध्ये त्यांना स्थान आहे.