काँग्रेसच्या सरकारांनी अलीकडच्या काळात बडय़ा सार्वजनिक उद्योगांना ‘नवरत्न’ वगैरे संबोधून त्यांचा गौरव केला. भाजप सरकारांनी यांतल्या काही कंपन्यांमध्ये र्निगुतवणूक वगैरे करून त्यांची ‘खरी किंमत’ वसूल करण्याचा प्रयत्न केला. तरीही यांतील बहुतेक सार्वजनिक उद्योग समस्याग्रस्त आहेत, हे नाकारता येत नाही. देशातील अनेक आयएएस अधिकारी या उद्योगांच्या व्यवस्थापनासाठी लंडनमध्ये जाऊन ‘मॅनेजमेंट अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ पब्लिक एंटरप्रायझेस’ किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करतात. तरीही सार्वजनिक उद्योग सातत्याने यशस्वीरीत्या चालवून आणि नफ्यात आणून दाखवणे त्यांच्यातील बहुतेकांना साधत नाही. या पाश्र्वभूमीवर कर्नल सत्यपाल वाही यांचे कर्तृत्व नजरेत भरणारे होते!

सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत कर्नल वाही यांनी बोकारो पोलाद कंपनी, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी कंपन्यांची जबाबदारी सांभाळली. सिमेंट कॉर्पोरेशन या कंपनीला तोटय़ातून नफ्यात आणण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. या कामगिरीमुळेच त्यांना तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनजीसी या कंपनीचे आधिपत्य करण्याची संधी मिळाली. ते आयएएस नव्हते. बनारस हिंदू विद्यापीठातून विद्युत व यंत्र अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यावर कर्नल वाहींनी लष्कराची वाट धरली. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीतून ते कोअर ऑफ ईएमईमध्ये दाखल झाले आणि पुढे कर्नल हुद्दय़ावरून निवृत्त झाले. लष्करी शिस्त आणि नेतृत्वाला अभियांत्रिकी दृष्टी आणि बांधणीची जोड देण्याची त्यांची क्षमता सार्वजनिक उद्योगांच्या विश्वात खुलत गेली. वाहींसारख्या ‘टेक्नोक्रॅट’ला अशी संधी मिळण्यासाठी पोषक वातावरण नेहरूयुगातच तयार झालेले होते.

ओएनजीसीमध्ये वाहींच्या कार्यकाळातच मुंबई किनाऱ्यालगत ‘बॉम्बे हाय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलविहिरींचा शोध लागलेला होता. याच काळात ओएनजीसीचे तेल उत्पादन दरमहा ९० लाख टनांवरून ३ कोटी २० लाख टनांवर पोहोचले याचेही श्रेय कर्नल वाही यांचेच. ओएनजीसीचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संगणकीकरण आणि कॉर्पोरेटायझेशन हे टप्पे इतर कोणत्याही सार्वजनिक कंपनीच्या आधी ओएनजीसीमध्ये प्रत्यक्षात उतरले. १९८२ मध्ये सागर विकास तेलविहिरीला लागलेली आग हा कर्नल वाही यांच्या कौशल्यांच्या कसोटीचा क्षण ठरला. विहिरीनजीक स्फोटानंतर संबंधित प्लॅटफॉर्मवरून ७५ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली. ‘क्रायसिस मॅनेजमेंट’ किंवा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात ही कामगिरी एक दाखला अभ्यास ठरली. कंपनी सामाजिक उत्तरदायित्वाचे आद्यप्रवर्तक म्हणूनही त्यांच्याकडे पाहावे लागेल. ओएनजीसीच्या कार्यक्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्वाचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले होते. त्यांच्या निधनामुळे सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील एक बहुपैलू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.

Story img Loader