रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून २५ वर्षांचा असलेला अध्यापनाचा दीर्घ अनुभव, रिसर्च गाईड, मुंबईतील रुईयानामक नामांकित महाविद्यालयाचे दीर्घकाळ भूषविलेले प्राचार्यपद अशी भलीमोठी ओळख मुंबई विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नावामागे आहे. तसे पेडणेकर विद्यापीठाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘वर्तुळा’तले नाहीत. अधिसभा, व्यवस्थापन परिषद आदी विद्यापीठाच्या महत्त्वाच्या प्राधिकरणांपासूनही ते दूरच राहिले; पण या प्राधिकरणांबरोबरच विद्यापीठांची प्राचार्य, संस्थाचालक, राजकारण्यांमार्फत चालविली जाणारी समांतर यंत्रणा कायम कार्यरत असते. त्यात मात्र पेडणेकर यांच्या नावाचा दबदबा कायम राहिला आहे.
डॉ. पेडणेकर २००६पासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्या आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम केले. सेंद्रिय रसायनशास्त्र हा अभ्यासाचा विषय असलेल्या पेडणेकर यांनी अमेरिकेतील ‘स्टिव्हन्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथून पीएचडी केली. संशोधक, मार्गदर्शक, प्राचार्य म्हणून कामाचा अनुभव त्यांना आहे. टाटा केमिकल लिमिटेडकडून त्यांना ‘उत्कृष्ट रसायनशास्त्र शिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनपत्रिकेत त्यांचे ४३ हून अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. या शिवाय सात संशोधन प्रकल्प, एक पेटंट त्यांच्या नावावर जमा आहेत. इंडो-अमेरिकन सोसायटी, इंडियन र्मचट्स चेंबर आदी संस्थांमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. नॅक, काकोडकर समिती, आयसीटीची विद्वत परिषद आदी ठिकाणी त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.
डॉ. पेडणेकर नसले तरी त्यांचे महाविद्यालय चालविणारी संस्था मात्र चांगलीच चर्चेत असते. आता लांबलेले निकाल, रखडलेला अभ्यास यामुळेच चर्चेत असलेल्या मुंबईनामक विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याने ती आणखी होणार, याची जाणीव असल्याने बहुधा निवड होताच क्षणी मुलाखत देताना ‘मला हारतुरे घेऊन भेटायला येऊ नका.. त्याऐवजी विद्यापीठाच्या भल्याकरिता सूचना घेऊन या,’ असे पेडणेकर यांनी सांगितले.
१५७ वर्षांची परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे नैराश्य आलेले शिक्षक, विद्यार्थी, प्राचार्य, माजी विद्यार्थी, हितचिंतक यांना नव्या कुलगुरूंच्या वक्तव्यामुळे आशावाद वाटावा.
डॉ. पेडणेकर यांना २०१२ सालचा महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला. ‘इंडियन केमिकल सोसायटी’, ‘इंडियन सायन्स काँग्रेस’सारख्या संस्थांमधील त्यांचे सदस्यत्व पाहता त्यांचा जनसंपर्कही दांडगा असल्याचे दिसून येते. केवळ प्राचार्याच्या संघटनांशीच नव्हे तर अनेक पत्रकारांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशी एकंदर अनुकूल स्थिती लाभल्याने विद्यापीठाला भेडसावणाऱ्या आव्हानांना ते निश्चितपणे सामोरे जाऊ शकतील अशी अपेक्षा आहे.