तीस-पस्तीस वर्षांपूर्वी अंगात कला असलेला एक तरुण खांद्यावर झोळी अडकवून नशीब काढायला पहिल्यांदा नगर जिल्ह्यातून पुण्यात आला, जवळ आवश्यक तेवढे कपडे आणि रंगपेटी होती. त्यांना कलाशिक्षक व्हायचे होते, हे ते छोटेसे स्वप्न या तरुणाला कुठल्या कुठे घेऊन गेले. आज ते ललित कला अकादमीचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांचे नाव उत्तम पाचारणे.
कलाशिक्षक व्हायचे म्हणून पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी कलाशिक्षकास लागणारी पदविका मिळवली. समाजातील वास्तवाच्या निरीक्षणातून त्यांची चित्रकला आकार घेत गेली. एका स्पर्धेसाठी त्यांनी ‘एकटा’ या शीर्षकाचे चित्र पाठवले होते त्याला पहिले बक्षीस मिळाले, तो त्यांच्या आयुष्यातील कलाटणी देणारा क्षण. तेथून पुढे कला हेच त्यांचे श्रेयस व प्रेयस बनले. कला महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांना मुंबईला जाण्यास सांगितले, तेथे त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळाला. तिथली शिल्पकला त्यांना अस्वस्थ करून गेली. त्यांनी प्रवेश चित्रकलेसाठी घेतला, तरी ते शिल्पकलेत रमू लागले. नंतर तेथील खानविलकर सरांनी शिल्पकलेच्या वर्गात त्यांना बोलावले. प्रत्येक शिल्पावर त्यांचे हात सराईत कलाकारासारखे फिरू लागले. शिल्पे जिवंत होऊन गेली. कलानगरी मुंबईने त्यांना स्वीकारले. नंतर प्रतिष्ठेच्या बॉम्बे आर्ट सोसायटीचे ते अध्यक्ष झाले. दहिसर चेकनाक्याजवळ त्यांचा स्टुडिओ आहे. तिथे अनेकविध शिल्पे रांगेत उभी आहेत, ते मुखवटे नाहीत तर चेहरे आहेत. कारण त्यात भावनांच्या ओंजळी मुक्तहस्ते उधळलेल्या आहेत. अंदमानाची स्वातंत्र्य-ज्योत, शाहू महाराजांचा पुतळा, सावरकरांचा बोरिवलीतला पुतळा, दहिसरमधला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, ‘मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ’ अशी अनेक शिल्पे त्यांनी साकारली. चित्रकार होण्यासाठी आलेल्या उत्तम पाचारणेंना विख्यात शिल्पकार म्हणून ओळख मिळाली. पाचारणे यांनी नंतर गोवा कला अकादमी, पु. ल. देशपांडे राज्य ललित कला अकादमीचे सल्लागार सदस्य म्हणून काम केले. राष्ट्रीय ललित कला पुरस्कार त्यांना १९८५ मध्ये मिळाला. त्यांनी तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किमान आठ पुतळे महाराष्ट्रात आहेत तर लखनौ विद्यापीठात १३ फुटी शिवपुतळा आहे. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात स्वातंत्र्य-ज्योतीचे शिल्प त्यांनी तयार केले होते. एका छोटय़ाशा गावातून कलेचे स्वप्न पाहत शहरात आलेला साधासा माणूस जेव्हा अशी बोलकी शिल्पे घडवतो, कलेच्या प्रांतातील सर्वोच्च संस्थेत उच्चस्थानी पोहोचतो, तेव्हा महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावल्याशिवाय राहत नाही.