आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसमध्ये १९८०च्या दशकाच्या पूर्वार्धात  कोणत्याही मुख्यमंत्र्याला स्थिरस्थावर होण्यास फारशी संधी दिली जात नसे. एक-दोन वर्षे झाल्यावर बदलाचे वारे वाहू लागत असत. दोनच दिवसांपूर्वी निधन झालेले गुजरातचे माधवसिंह सोळंकी हे मात्र यास अपवाद! त्यांनी लोकाभिमुख राहून पद टिकवले.

आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत येताच, महाराष्ट्रात बॅ. ए. आर. अंतुले तसेच गुजरातमध्ये माधवसिंह सोळंकी यांना ‘निष्ठेची फळे’ मिळाली होती. १९८० मध्ये जनता पक्षाची राज्यांमधील सरकारे बरखास्त करण्यात आली आणि विधानसभा निवडणुकांतही काँग्रेसला बहुतांश राज्यांमध्ये सत्ता मिळाली. गुजरातमध्ये सोळंकी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. सोळंकी हे पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर कायम राहिल्यावर १९८५ मध्ये पुन्हा निवडणुकांना सामोरे जाताना सरकारविरोधातील नाराजीचा फटका बसण्याची भीती व्यक्त के ली जात होती. मात्र मधल्या काळात सोळंकी यांनी क्षत्रिय- हरिजन- आदिवासी- मुस्लीम (खाम) या सर्व समाजांना एकत्र आणण्याचा प्रयोग के ला. हा ‘खाम’ प्रयोग भलताच यशस्वी ठरला आणि १८२ पैकी १४९ जागा काँग्रेसला मिळाल्या. याच समीकरणामुळे पटेल आणि उच्चवर्णीय समाज काँग्रेसपासून दूर गेला आणि या समीकरणाचा सोळंकी यांना मिळालेला फायदाही दीर्घकाळ टिकला नाही. आरक्षणाच्या मुद्दय़ावर हिंसाचार झाला व शेवटी सोळंकी यांना राजीनामा द्यावा लागला.

चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या सोळंकी यांनी मुलींना मोफत शिक्षण तसेच अन्य अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले होते. पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असताना स्वित्झर्लंड दौऱ्यातील वादग्रस्त पत्राने त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. तेव्हा बोफोर्स चौकशी गाजत होती आणि डाव्होस दौऱ्यावर असताना सोळंकी यांनी स्विस परराष्ट्रमंत्र्यांना बोफोर्सची अधिक चौकशी करू नये अशी विनंती करणारे पत्र दिल्याची बातमी आल्याने बराच वादंग झाला. पण गांधी कु टुंबीयांशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या सोळंकी यांनी त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली तरी या पत्राबाबत शेवटपर्यंत मौन बाळगले. काँग्रेस पक्षात अहमद पटेल यांचा दबदबा होता. सोळंकी व पटेल यांच्या गटांत पक्षांतर्गत वाद होतेच. पण सोनिया गांधी यांनी सोळंकी किंवा पटेल या दोघांचीही बाजू घेण्याचे टाळले होते. यावरून सोळंकी यांचे पक्षात किती महत्त्व होते हे लक्षात येते. गुजरातमध्ये जनाधार लाभलेला अखेरचा काँग्रेसी चेहरा, असे सोळंकी यांचे वर्णन करावे लागेल.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhav singh solanki profile abn