बाला रफीक शेखने अभिजीत कटकेला सहज नमवून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेतेपदाची मानाची गदा प्रथमच पटकावून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. मातीवरील कुस्तीत तो तरबेज होता; परंतु ‘महाराष्ट्र केसरी’चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्याने आठवडय़ातून दोनदा मॅटचाही सराव सुरू केला. या मेहनतीचेच फळ त्याला जेतेपदामुळे मिळाले.
बुलढाण्याकडून ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत उतरणारा बाला रफीक हा मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. दोन वेळचा खुराक मिळणेसुद्धा त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरत होते. गेल्या पाच पिढय़ा कुस्तीची परंपरा या शेख कुटुंबीयांनी जोपासली. वडील आझम शेख यांनी मुलांच्या कुस्तीसाठी गांभीर्याने मेहनत घेतली. बाला रफीक हा त्यांचा तिसरा मुलगा. पहिल्या दोन मुलांनीही कुस्तीमध्ये नशीब अजमावून पाहिले. परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मग शेख कुटुंबीयांनी बाला रफीकच्या खेळाकडे लक्ष केंद्रित केले.
शांत स्वभाव आणि वादांपासून स्वत:ला दूर ठेवणे ही बाला रफीकची वृत्ती. गेली आठ वर्षे कुस्तीच्या आखाडय़ात अविरत सराव सुरू असताना त्याने शिक्षणही सांभाळले आहे. तो आता बारावीला आहे. गेली दीड वर्षे त्याला दुखापतीने सतावले होते. मात्र त्या आव्हानांवर मात करून त्याने पुनरागमन केले आहे. पहाटे साडेचारला उठून पर्वती पालथी घालण्याचा त्याचा नेहमीचाच शिरस्ता. मातीमधील मल्ल असला तरी तो नित्यनेमाने व्यायामशाळेतही जातो.
प्रतिकूल परिस्थितीतून घडणाऱ्या बाला रफीकला बुलढाण्यात योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. मग कोल्हापूरमध्ये त्याने कुस्तीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी बरीच वर्षे घालवली. गणपतराव आंदळकर यांनी बाला रफीकवर कुस्तीचे संस्कार घडवले. तो आंदळकरांचा शेवटचा शिष्य ठरला. त्याने रविवारी जालना येथे पराक्रम गाजवल्यानंतर म्हणूनच ‘आंदळकर यांचा विजय असो’ हा नारा तिथे घुमू लागला. जून २०१८ पासून त्याने पुण्याच्या गणेश दांगट यांच्या आखाडय़ात ‘महाराष्ट्र केसरी’चे लक्ष्य समोर ठेवून सरावाला प्रारंभ केला. याशिवाय गणेश घुले आणि वांजळे वस्ताद यांचे मार्गदर्शनही बाला रफीकला लाभले आहे.
बाला रफीकचा इथपर्यंतचा प्रवास हा संघर्षमय असाच आहे. विविध कुस्त्या जिंकल्यानंतर मिळालेली पदके आणि गदा ठेवण्यासाठी घर अपुरे पडते आहे. परंतु या यशानंतरच त्याचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. कटकेला नमवून ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद पटकावणाऱ्या बाला रफीकला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. खाशाबा जाधव यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या या मल्लाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मुद्रा उमटवावी.