११ मे १९४० रोजी बीबीसीची हिंदी सेवा सुरू झाली. नंतरच्या दशकात माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, हिमांशु कुमार भादुरी, ओंकारनाथ श्रीवास्तव, विश्वदीपक त्रिपाठी असे एकाहून एक दिग्गज या हिंदी सेवेत कार्यरत होते. त्यातीलच एक होते महेंद्र कौल. या कौल यांच्या निधनाने, बीबीसीच्या प्रारंभ- काळातला एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

१९२३ मध्ये काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्य़ात कौल यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षण तेथेच घेतल्यानंतर ते श्रीनगर आकाशवाणी केंद्रात रुजू झाले. बातम्या देण्याबरोबरच काश्मीरमधील परिस्थितीविषयी अनेक कार्यक्रमही त्यांनी सादर केले. पुढे काही काळ ते अमेरिकेत गेले, तेथे ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’मध्ये त्यांनी काम केले. आपल्या कामाचा ठसा उमटवूनच ते लंडनला गेले. तेथे बीबीसीच्या हिंदी सेवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी तेथे काम केले. आशियाई देशांतील श्रोत्यांसाठी ‘नई जिंदगी, नया जीवन’ हा मुलाखतींचा कार्यक्रम ते सादर करीत. याला तुफान लोकप्रियता त्या काळात मिळाली. ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे माध्यम प्रतिनिधी बर्नार्ड इंगहॅम यांनी ‘भारतीय वंशाचे ब्रिटनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्व’ अशा शब्दांत कौल यांची ओळख थॅचरबाईंना करून दिली होती. यातूनच ते जनमानसात किती लोकप्रिय होते ते कळून येते. कौल यांनी प्रसिद्ध ‘गेलॉर्ड हॉटेल’ समूहात मोठी गुंतवणूक केली होती. लंडनमधील लोकांना तंदुरी खाद्यपदार्थाची लज्जत चाखता यावी यासाठी १९६६ मध्ये पहिला तंदूर त्यांनीच आयात केला होता.

‘नई जिंदगी, नया जीवन’ या कार्यक्रमाने कौल यांना यशोशिखरावर नेले. बिगरइंग्रजी श्रोत्यांसाठी हा कार्यक्रम १९६८ ते ८२ अशी तब्बल १४ वर्षे बीबीसीवरून प्रसारित झाला. हिंदी वा उर्दू मातृभाषा असणाऱ्यांमध्ये हा कार्यक्रम कायम ऐकला जात असे. याच कार्यक्रमात मार्गारेट थॅचर, भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, राज कपूर, दिलीप कुमार, नर्गीस अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांना घेता आल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना अनेक मानाची पारितोषिके मिळाली. ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा किताब मिळवणारे ते पहिले विदेशस्थ भारतीय ठरले. नंतर ‘डय़ूक ऑफ एडिंबर्ग पुरस्कार’देखील त्यांनी पटकावला. त्यांची पत्नी रजनी याही पत्रकार होत्या, तर कन्या कल्याणी ही आता ब्रिटिश न्यायाधीश आहे. ९५ वर्षांचे प्रदीर्घ आणि कृतार्थ आयुष्य जगल्यानंतर बुधवारी त्यांनी या जगाचा शांतपणे निरोप घेतला.

Story img Loader