लघुकथा या साहित्य प्रकारात अतिशय कमी अवकाशात मोठा अर्थ असलेली गोष्ट सांगण्याची कसरत करतानाच भाषिक बाज सांभाळताना त्याची नाळ समाजाशी जोडली जाते. या प्रकारच्या लेखनाची हातोटी, तेही आफ्रिकन देशातील एका तरुणीने कमी वयात मिळवून या क्षेत्रातील नोबेल मानला जाणारा केन पुरस्कार पटकावणे ही स्तिमित करणारी बाब. या लेखिकेचे नाव आहे मकेना ओनजेरिका, ती आहे केनियाची. १० हजार पौंडांचा हा पुरस्कार आहे. तिची ‘फँटा ब्लॅककरंट’ ही कथा २०१७ मध्ये ब्रिटनमधील वॅसाफिरी या साहित्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती.
मकेना ही न्यूयॉर्क विद्यापीठातील सर्जनशील लेखनाच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. तिच्या कथा अर्बन कन्फ्यूजन व वॅसाफिरी या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. तिची ‘फँटा ब्लॅककरंट’ कथा मेरी या नैरोबीतील रस्त्यावर वाढलेल्या मुलीची आहे. अर्थात हे जीवन लेखिकेनेही अनुभवले असल्याने इतक्या संवेदनशीलतेने ही कथा उतरली आहे. या मुलीला फँटा ब्लॅककरंट हे पेय हवे असते. रस्त्यावरचे जीवन जगताना खरे तर अस्तित्वाचा संघर्ष. पण तरी मेरी हे स्वप्न पाहते व त्यासाठी वाटेल ते करायची तिची तयारी असते. यात लेखिकेने रस्त्यावरच्या मुलांची भाषा वापरली आहे. या सगळ्या स्वप्नामागे धावताना मेरी वेश्या व्यवसायात जाते, गर्भवती राहते, तरीही ब्लॅककरंट पिण्याचे तिचे स्वप्न तिला सोडत नाही. नंतर नैरोबीतील एका श्रीमंती उद्योजक महिलेच्या घरी ती चोऱ्या करते, गुन्हेगारी जगाचे लक्ष तिच्याकडे वळते. ते तिला खूप मारहाण करतात, जवळपास मृतवत होण्याइतकी. त्यातूनही ती बऱ्याच काळाने बाहेर पडते. नंतर कथेच्या शेवटी ती तो प्रदेश सोडून नदी ओलांडून दुसरीकडे जायला लागते, अज्ञात भविष्य घेऊन.. वेदना, दु:ख, समीपता, विनोद ही जीवनाची सर्व अंगे या कथेत गुंफताना कथेचे रचनावैशिष्टय़ अतिशय वेगळे आहे. दिवंगत सर मायकेल केन यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. ते २५ वर्षे बुकर पुरस्कार समितीच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. आफ्रिकन देशातून चांगले लेखक तयार व्हावेत, यासाठी नोबेल विजेते लेखक वोल सोयिन्का व जे. एम. कोझी हे या पुरस्काराचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. केनियाची लेखिका असलेल्या मकेना हिने पुरस्काराच्या या पैशातून रस्त्यावरील मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी काही निधी देण्याचे ठरवले आहे. ही कथा म्हणजे आश्रमशाळेत तिला आलेल्या अनुभवाचे सार आहे. यात मुलांची वेगवेगळी पात्रं आहेत, ती समाजाकडून स्वीकार एवढीच अपेक्षा करतात, पण मेरी हे पात्र वेगळे आहे. ती ‘फँटा ब्लॅककरंट’ या पेयातून जीवनाचा गोडवा मागते आहे. रस्त्यावर वाढणाऱ्या या मुलांची ‘विश लिस्ट’ फार साधी आहे, पण ती अधुरीच राहते, थोडय़ाफार फरकाने अगदी भारतातही रस्त्यांवर वाढणाऱ्या मुलांशी नाते जोडणारी कथा अस्वस्थ करणारी आहे.