भारतीय बँकिंग व्यवस्थेला बट्टा लावून फरार आर्थिक गुन्हेगारामुळे, मल्या या आडनावाची अपकीर्ती झाली, परंतु देशाच्या बँकिंग व्यवस्थेत चार दशकांच्या सेवेमुळे एम. डी. मल्या यांच्यामुळे प्रतिष्ठित रूपही लाभले आहे. बँक ऑफ बडोदा व त्याआधी बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारकीर्द राहिलेले मंगलोर देवदास मल्या हे नाव देशाच्या बँकिंग प्रणालीचे ‘क्लास’ ते ‘मास’ संक्रमणासाठी प्रयत्न करणाऱ्या मोजक्या नावांमध्ये निश्चितच गणले जाईल. रविवारी नवी दिल्लीत दीर्घ आजारपणात त्यांची प्राणज्योत ६६ वर्षी मालवली.

देशाचे ग्रामीण क्षेत्र औपचारिक बँकिंग परिघाखाली आणावे आणि जुनाट सावकारी पाशातून ग्रामीण जीवन मुक्त करावे हे बँकांच्या राष्ट्रीयीकरणामागील एक ठळक उद्दिष्ट होते. तथापि ध्यास घेऊन प्रयत्न अभावानेच होताना दिसले. मल्या यांनी यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ग्रामीण क्षेत्रासाठी समर्पित कर्मचारीवृंद तयार करण्यावर भर दिला. भारतीय बँक महासंघ (आयबीए)चे अध्यक्ष म्हणून ग्रामीण क्षेत्रीय बँकांच्या भांडवली आणि तंत्रज्ञानात्मक सक्षमीकरण, एकत्रीकरणावर त्यांनी सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेबरोबर समन्वयात मोलाची भूमिका बजावली. खडतर स्थितीतून बँक ऑफ महाराष्ट्राचा कायापालट घडला तो मल्या यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच. या कामगिरीची दखल घेत बँक ऑफ बडोदासारख्या तुलनेने तगडय़ा बँकेचे प्रमुखपद त्यांच्याकडे आले. बँकेचे कर्मचारी हेच बँकेचे अस्सल दूत आहेत, हे मल्या यांनी उक्ती आणि कृतीतूनही सदा बिंबवले. वरिष्ठांच्या, अगदी अध्यक्ष म्हणून आपल्या आदेशाचीही फिकीर करू नका, बँकेसाठी योग्य आहे तेच कर्मचाऱ्यांनी करावे, हा त्यांचा आग्रह असे. फुगत चाललेल्या अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) हा बँकिंग जगतासाठी चिंतेचा विषय आहे; परंतु कर्ज- मग ते कितीही असो, कागदी दस्तांपलीकडे प्रत्यक्ष कर्जदार ग्राहकाला व्यक्तिगतरीत्या समजून-उमजून घेऊन मगच देण्याचा त्यांनी दंडक घालून दिला. म्हणूनच कदाचित आजच्या संकटकाळात बँक ऑफ बडोदाची बुडीत कर्जाची मात्रा वाजवी पातळीवर आहे.

अभियांत्रिकी पदवी आणि बेंगळूरुच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून व्यवस्थापनाची पदविका घेऊन, मल्या हे जाणीवपूर्वक बँकिंग कारकीर्दीकडे वळले. ऑगस्ट १९७६ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेशन बँकेतून त्यांची कारकीर्द सुरू झाली. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये कार्यकारी संचालक असताना, खासगी क्षेत्रातील अरिष्टग्रस्त ग्लोबल ट्रस्ट बँकेला सामावून त्यांची मोलाची भूमिका राहिली. ३६ वष्रे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ते कार्यरत होते. आजारपणामुळे अनेक कंपन्यांवरील संचालक पदावरूनही त्यांचा तात्पुरता विश्रामकाळ सुरू होता आणि आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदाचा प्रस्तावही याच कारणाने त्यांनी सविनय नाकारला.

Story img Loader