ज्यांना घरातूनच संगीताचा वारसा लाभला अशा मंजू मेहता यांचे नाव सतारवादनाच्या क्षेत्रात असलेल्या मोजक्या महिला कलाकारांत आदराने घेतले जाते. जयपूरच्या भट घराण्यातील मेहता यांना मध्य प्रदेश सरकारचा यंदाचा तानसेन सम्मान प्रदान करण्यात आला. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे गेली ९४ वर्षे तानसेन संगीत महोत्सव अव्याहतपणे सुरू असून त्यात दिला जाणारा दोन लाखांचा हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यांचे बंधू शशिमोहन भट यांच्या मार्गदर्शनाखाली मंजू मेहता यांनी सतारवादनाचे धडे घेतले. नंतर दामोदरलाल काबरा व पंडित रविशंकर यांनी त्यांना सतारवादनातील आणखी बारकावे शिकवले. त्यामुळेच आज त्या आघाडीच्या महिला सतारवादक आहेत. देशपरदेशात त्यांनी अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणी व दूरचित्रवाणीवर ‘अ’ दर्जाच्या कलावंत म्हणून त्यांनी कला सादर केली.
जोधपूर विद्यापीठ व अहमदाबादच्या दर्पण कला संस्थेत त्या गेली तीस वर्षे अध्यापन करीत आहेत. अहमदाबादेत सप्तक स्कूल ऑफ म्युझिक या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी संगीताचे कार्यक्रम केले जातात. अहमदाबादचे तालवादक नंदन मेहता (तबलावादक- पं. किशन महाराज यांचे शिष्य) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे त्यांच्या वाद्य संगीताला ताल संगीताची जोड मिळाली. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतात तालवाद्यांना पारंपरिक स्थान आहे, पण तो पुरुषांचा प्रांत असूनही त्यात त्यांनी विलक्षण निपुणता मिळवली आहे. मंजू मेहता या सर्जनशील कलाकार आहेत, अशा शब्दांत उस्ताद अली अकबर खान यांनी त्यांचा गौरव केला होता. जयपूर येथे सतारवादकांच्या घराण्यात जन्मलेल्या मंजू यांनी वयाच्या तेराव्या वर्षी सतारवादन शिकायला सुरुवात केली. मोठे बंधू शशिमोहन भट हे त्यांचे पहिले गुरू. विश्वमोहन भट हे त्यांचे कनिष्ठ बंधू. त्यांचे आईवडील मनमोहन व चंद्रकला भट हे संगीतकार होते. त्यांनी मुलांना संगीत शिकण्यास उत्तेजन दिले. मंजू मेहता यांच्यासारख्या कलाकारांना महिला म्हणून अनेक पारंपरिक बंधने मोडण्याचे आव्हान होते. ख्याल गायकीत सुरुवातीला काही महिला गायिकांना संधी मिळाली, पण तालवाद्ये त्यांना शिकवली जात नव्हती. हे सगळे अडथळे पार करीत आज महिला संगीत क्षेत्रात पुढे येत आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व मंजू मेहता यांच्यासारख्या कलाकार करीत आहेत. फटाक्यांची आतषबाजी करावी तसे त्यांचे संगीत उथळ नाही, तर त्यात एक वेगळी लय व ताल आहे. वाद्यसंगीतातील रागदारीतून भक्ती, प्रेम, आनंद या भावनांचा उत्कट आविष्कार हे त्यांचे वैशिष्टय़ आहे.