तेलुगू ही मातृभाषा असूनही ‘रंध्री.. रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी.. मराठी नसे का आमुची माय बोली..’ अशा शब्दांत मायमराठीवरही तेवढेच प्रेम करणारे कवी व साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली भाषाभगिनींच्या एकात्मतेचे खरे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने मराठी-तेलुगू भाषांना जोडणारा सेतू कोसळला आहे. ‘सांगू शकाल का तुम्ही, शाळेतून कधीच न परतलेल्या मुलांच्या आईच्या डोळ्यांतील अश्रूंचा धर्म’ या त्यांच्या काव्यपंक्तीतील मानवनिर्मित विनाशकारी संघर्ष मनाला सुन्न करणारा होता. सामाजिक स्थितीवर भाष्य करीत मूल्यांची घसरण दाखवणाऱ्या त्यांच्या कविता अंतर्मुख करणाऱ्या होत्या.
मैफल, झुंबर, सावली हे काव्यसंग्रह, विरहिनी वासवदत्ता हे काव्यनाटय़, गवाक्ष हा ललित लेखसंग्रह, तेलुगू फुलांचा मराठी सुगंध, दक्षिण भाषेतील रामायणे (तौलनिक अभ्यास), लक्ष्मीनारायण बोल्लींच्या कविता (कवितासंग्रह), गवताचे फूल (बालकवितासंग्रह), गीत मरकडेय (गीतसंग्रह), कृष्णदेवराय, कविराय राम जोशी (कादंबरी), कवितेचा आत्मस्वर दत्ता हलसगीकर (ललित चरित्र) अशी विपुल व आशयघन साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. अभंग कलश (वाचनानुवाद), पंचपदी (काव्यानुवाद), रात्र एका होडीतली, एका पंडिताचे मृत्युपत्र, संतकवी वेमन्ना, यकृत (नाटय़ अनुवाद), कमलपत्र, राजर्षी शाहू छत्रपती आणि रात्रीचा सूर्य (खंड काव्यानुवाद), स्वरलय (भारतीय संगीतकाराचा) हे त्यांचे अनुवादित साहित्य. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र त्यांनी तेलुगूतून लिहिले. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा : राम गणेश गडकरी’ हे त्यांनी लिहिलेले ललित चरित्र पूर्णत्वास आले. त्याचे प्रकाशन होण्यापूर्वीच डॉ. बोल्ली यांनी जगाचा निरोप घेतला. मराठी साहित्य संमेलन तसेच तेलुगू साहित्य संमेलनामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असे. कवी, साहित्यिक, नाटककार, अनुवादक अशी बहुमुखी प्रतिभा त्यांना लाभली. बोल्ली कुटुंब मूळचे तेलंगणच्या गुंडारम (वरंगल)चे. विणकाम व्यवसायासाठी सोलापुरात स्थायिक झाले. १५ एप्रिल १९४४ रोजी डॉ. बोल्ली यांचा जन्म सोलापुरात झाला. त्यांचे वडील राजकारणात होते. परंतु डॉ. बोल्ली यांनी तेलुगू-मराठी साहित्याची वाट निवडली. ‘तेलुगू गळा, पण मराठीचा लळा’ असे ते नेहमी म्हणत. ‘एका साळियाने’ या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘कविराय राम जोशी’ या कादंबरीला दमाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लिहिता लिहिताच मरण यावे अशी त्यांची इच्छा होती. ती शब्दश: पूर्ण झाली. लिहिता लिहिताच त्यांनी जगाचा निरोप घेतला.