अमेरिकेतील हबल अवकाश दुर्बिणीचा वापर करून विश्वातील अनेक नवीन गोष्टींचा उलगडा करणाऱ्या पहिल्या काही महिला खगोलशास्त्रज्ञांपैकी एक म्हणजे मार्गारेट बर्बिज. त्यांचे नुकतेच निधन झाले, मात्र त्या शतायुषी ठरल्या.

सॅन दियागो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी १९६२ ते १९८८ या काळात काम केले. ताऱ्यांमध्ये जड मूलद्रव्ये कशी तयार होतात व ती विश्वात कशी पसरतात याचा त्यांनी केलेला अभ्यास महत्त्वाचा होता. ताऱ्यांमध्ये मूलद्रव्ये जन्म घेतात हे १९५० पासून माहिती होते, तरी ती नेमकी कशी तयार होतात याचा उलगडा करणारा शोधनिबंध बर्बिज व सहकाऱ्यांनी लिहिला. ताऱ्यांमध्ये होणाऱ्या विस्फोटातून ही मूलद्रव्ये पुढे विश्वात पसरतात असे त्या शोधनिबंधात म्हटले होते. त्यांच्या या संशोधनात सहभागी असलेल्या एका सहकाऱ्याला नंतर तारकीय अभिक्रियांच्या उलगडय़ासाठी नोबेल मिळाले होते. क्वासार किंवा अति जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरांचे संशोधनही त्यांनी केले, त्यासाठी हबल अवकाश दुर्बिणीच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात माहिती गोळा केली. मात्र, केवळ महिला असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एका प्रमुख संशोधन संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी ‘पतीची सहायक’ म्हणून वावरावे लागले. त्यांचे पती खगोलशास्त्रज्ञ होते. प्रत्यक्षात त्यांच्या पतीपेक्षा त्यांची भूमिका ही प्रमुख होती, तरीही. त्यांचे काम मोठे असूनही त्यांना अनेक पुरस्कार मिळू शकले नाहीत. महिलांच्या व्यावसायिक जीवनातील अडथळ्यांचा उबग येऊनही त्या कधीच हताश झाल्या नाहीत.

जन्माने त्या ब्रिटिश. बालपणापासून रात्रीच्या दुधाळ चांदण्याने भरलेल्या आकाशाने भुरळ घातली होती. त्यांचे वडील रसायनशास्त्र प्रयोगशाळेत काम करीत. लंडनच्या रॉयल ग्रीनिच वेधशाळेच्या पहिल्या महिला संचालक बनण्याचा मान त्यांना नंतर मिळाला होता. हबल दुर्बिणीच्या बांधणीतही त्यांचा वाटा होता. लंडनच्या वेधशाळेत काम करीत असताना त्यांना विल्सन दुर्बिणीची देखभाल करण्याची संधी मिळाली, पण त्याचा त्यांनी अवकाश निरीक्षणासाठी पुरेपूर वापर केला. महायुद्धकाळात मात्र त्यांच्या निरीक्षणात ब्लॅकआऊटमुळे अनेक अडथळे आले. अनेक वेधशाळांत त्यांना केवळ महिला असल्याने निरीक्षणाची संधी नाकारण्यात आली होती, तरी त्यांनी मनोबल कायम ठेवले. १९८३ मध्ये त्यांना अमेरिकेत राष्ट्रीय विज्ञान पदक देऊन गौरवण्यात आले, तेव्हा व्हाइट हाऊसने त्यांच्यावर महिला म्हणून झालेल्या अन्यायाची कबुली दिली होती. नम्र व मृदुभाषी असलेल्या बर्बिज यांच्या जाण्याने एका आदर्श वैज्ञानिकाचा अस्त झाला आहे.