मोटारगाडय़ांच्या स्पर्धेतील थरार सगळ्यांना माहिती आहे तो फॉम्र्युला वन (एफ १) स्पर्धेमुळे. ही एक साहसी व रोमांचकारी स्पर्धा आहे. त्यात भाग घेणाऱ्या मारिया तेरेसा द फिलिपीस या पहिल्या महिला स्पर्धक. त्यांच्या निधनाने साहसी स्पर्धेतील सहभागाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा देणारी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे.

त्यांचा जन्म इटलीतील नेपल्सचा. लहान असतानापासून त्या साहसीच होत्या. श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या असल्याने त्यांना कुठल्या मर्यादा नव्हत्या. त्या घोडय़ावर स्वार होत असत. स्कीइंग व टेनिस खेळणे हा त्यांचा विरंगुळ्याचा भाग. त्यांचे भाऊ अँटोनियो व गिसेपी यांनी त्यांच्या मोटार चालवण्याच्या कौशल्यावर शंका घेतली होती, पण जिद्दीपुढे असे टोमणे टिकत नसतात, हे त्यांनी फॉम्र्युला वनपर्यंत मजल मारून दाखवून दिले होते. १९४८ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी फियाट टोपोलिनो ही गाडी १० कि.मी.च्या छोटय़ाशा स्पर्धेत चालवली होती. भावांनी जरी त्यांना काहीसे नाउमेद केले होते तरी जन्मदात्या आईने मात्र त्यांना एक कानमंत्र दिला होता. मारिया, तू सुरुवातीला हळू जा, पण जिंकून दाखव.. आईच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ती देशांतर्गत स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी टाराशी युरानिया, गियॉर-फियाट यासारख्या ७५० ते ११०० सीसीच्या अवजड गाडय़ांवरही हात अजमावला होता. मोटरस्पोर्ट हा साहसी खेळ. त्यातील धोके व आव्हाने फार मोठी असतात. प्रसंगी प्राणावरही बेतू शकते. मारिया फॉम्र्युला वनमधील पहिल्या महिला चालक ठरल्या. त्यांनी १९५८-५९ मध्ये काही ग्रॅण्ड प्रिंक्स स्पर्धात सहभाग नोंदवला होता. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी या खेळातील करिअर सुरू केले. फियाट ५०० ही पहिली स्पर्धा त्यांनी जिंकली. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

अपयश हे सुरुवातीला येतेच तसे त्यांनाही आले. १९५८ मध्ये मोनॅको ग्रॅण्ड प्रिंक्समध्ये पात्रता फेरीतच त्या बाद झाल्या. नंतर बेल्जियम ग्रॅण्ड प्रिंक्समध्ये दहावा क्रमांक मिळवला. एका स्पर्धेत त्यांचे लुईगी मुसो यांच्यावर प्रेम जडले. त्यांनीच मारिया यांना गाडी चालवण्याचे अचूक तंत्र शिकवले. अनेक स्पर्धात ते एकत्र होते. त्यांच्यात पैजाही लागायच्या. मारिया यांनी फॉम्र्युला वनच्या काही स्पर्धात भाग घेतला, पण नंतर त्यांच्या संघाचे मालक जीन बेहरा यांच्या निधनानंतर त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या प्रेरणेमुळेच लेला लोम्बार्डी, दिविना गालिका, डिझायर विल्सन, गिवोना अमाटी, सारा फिशर, कॅथरिन लेजी, सॉबेर, सुसी वूल्फ यांनी एफ १ स्पर्धेसाठी प्रयत्न केले होते.

मारिया द व्हिलोटा यांचा २०१२ मध्ये मोटार चालवताना मृत्यू झाला होता.

Story img Loader