रिचर्ड डॉकिन्स हे आजघडीला विवेकवादाची आणि इहवादी तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे जगन्मान्य विचारवंत. या डॉकिन्स यांच्या ‘स्वार्थ’विषयक मांडणीतील तर्कदोष दाखवून देण्याचेच नव्हे तर ‘स्वार्था’ला स्वत:पुरते न ठेवण्याची ‘प्रेरणा’ मनुष्याला हवी असते, असे सकारात्मक प्रतिपादन डॉकिन्स यांच्याच मांडणीचा भाग असला पाहिजे हे सांगण्याचेही काम ज्यांनी केले त्या मेरी मिजले.आधुनिकतावादी (मॉडर्निस्ट) विचारसरणीत मोलाची भर घालणाऱ्या ब्रिटिश तत्त्वचिंतक मेरी मिजले यांचे वयाच्या ९९व्या वर्षी निधन झाले.
ही ‘मोलाची भर’ कोणती? याचे एका शब्दात उत्तर आहे : प्राणीहक्क! मिजले यांनी प्राण्यांच्या हक्कांविषयीची तत्त्वज्ञानाधारित तार्किक मांडणी ‘अॅनिमल्स अॅण्ड व्हाय दे मॅटर : अ जर्नी अराऊंड द स्पीशीज बॅरिअर’ (१९८३) या ग्रंथातून केली. हे त्यांचे तिसरे पुस्तक. मानवाच्या प्राणित्वाचे पुढे काय होते, हा त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय होता आणि त्या संशोधनाला १९७८ साली मिळालेले ‘बीस्ट अॅण्ड द मॅन’ हे पुस्तकरूपही या दृष्टीने महत्त्वाचे होते. पण १९८३ सालच्या पुस्तकाने प्राणीहक्कांच्या मागणीचे तर्कभान अधिक सखोल केले. ही सखोलता करुणेतूनच येणार, हे तर सामान्यांनाही माहीत असते. पण मेरी यांचे मोठेपण असे की, त्यांनी तत्त्वचिंतक या नात्याने ‘करुणे’चीही चिकित्सा केली. ‘दुष्टपणा’च्या तात्त्विक उलटतपासणीपासून ते ‘युटोपियाज, डॉल्फिन्स अॅण्ड कम्प्युटर्स’ किंवा ‘सायन्स अॅण्ड पोएट्री’ यांसारख्या पुस्तकांपर्यंत अनेक अंगांनी त्यांनी करुणा ही मानवी प्रेरणा कशी काय उद्भवते, याचा वेध घेतला. पण म्हणून ख्रिश्चनांचे करुणावादी तत्त्वज्ञान त्यांनी उचलून धरले, असे मात्र अजिबात नाही. उलट जगाबद्दलच्या ख्रिस्ती संकल्पनेला भिरकावून देणारा चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीवाद हा त्यांचा वैचारिक पाया होता. डार्विनोत्तर तत्त्वज्ञान हे मूलत: नास्तिकतावादी किंवा इहवादी आहे आणि मेरी मिजेटही त्यास अपवाद नव्हत्या. ख्रिस्ती वा एकंदर धर्मभोळय़ा संकल्पनांचा पाया पूर्णत: नाकारून आपल्याला विज्ञानवादी, तार्किक चिंतन पुढे न्यायचे आहे, हे भान त्यांना नेहमी होते. तत्त्वचिंतकाचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुळात, लोकांना काय प्रश्न पडतात हे त्याने (तिने) ओळखावे, ही अपेक्षा मेरी मिजेट यांनी तंतोतंत पाळली. स्त्रीवादाच्या मर्यादांची चिकित्सा असो की संगणकयुगामुळे येऊ घातलेले नवे प्रश्न असोत, लोकांचे कोणते प्रश्न – किंवा प्रश्नांची जाणीवच न झाल्याने होणारे कोणते गोंधळ – तत्त्वज्ञानाने हाताळले पाहिजेत, हे त्यांनी जाणले होते.