मुळातच गणिताच्या क्षेत्रात महिलांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असताना त्यांना ‘आबेल’सारखा गणितातील नोबेल पुरस्कार मिळणे तसे कठीणच, पण या वर्षी पहिल्यांदा हा पुरस्कार एका महिलेला देण्यात आला आहे; त्यांचे नाव आहे कॅरेन केस्कुला उलेनबेक. त्या अमेरिकेतील ऑस्टिन येथे टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक आहेत. भौमितिक विश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेज थिअरी, इंटिग्रेबल सिस्टीम्स या विषयातही त्यांचे संशोधन आहे. नॉर्वेचे गणितज्ञ नील्स हेन्रिक आबेल यांच्या स्मृतिनिमित्त नॉर्वेजियन अॅकेडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स या संस्थेच्या वतीने ७ लाख डॉलरचा हा पुरस्कार केवळ गणितातील संशोधनासाठी दिला जातो. उलेनबेक या केवळ गणितज्ञच आहेत असे नाही, तर विज्ञान व गणित क्षेत्रातील लिंगसमानतेच्या कडव्या पुरस्कर्त्यांही आहेत. पार्क सिटी मॅथेमेटिक्स इन्स्टिटय़ूटच्या संस्थापकांपैकी त्या एक. या संस्थेच्या वतीने तरुण संशोधकांना गणितात काम करण्याची संधी दिली जाते. गणितातील आव्हाने नेमकी काय आहेत व त्याचा व्यवहारात वापर कसा करता येईल यावर येथील संशोधनाचा भर आहे.
महिलांना गणिताच्या क्षेत्रात संधी देण्यासाठी या संस्थेचा ‘वुमेन अँड मॅथेमेटिक्स प्रोग्रॅम’ आहे तो त्यांनीच सुरू केला. साबणाच्या बुडबुडय़ांच्या पृष्ठभागाबाबत त्यांचे संशोधन विशेष गाजले. अशा पृष्ठभागांचे निरीक्षण करणे फार अवघड असते व त्यातून काही सिद्धांत तयार करणे तर दूरची गोष्ट, पण ते आव्हान त्यांनी सक्षमरीत्या पेलले. भौतिकशास्त्र व गणितात त्यांनी समकालीन भौमितिक प्रारूपे तयार केली. आबेल पुरस्कार विजेते सर मायकेल अतिया यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘गेज थिअरी’वर काम केले होते. जे आतापर्यंत कुणी करण्यास धजावले नाही ते उलेनबेक यांनी केले, त्यामुळेच त्यांच्या संशोधनातून गणितातील एक नव्या शाखेचा पाया रचला गेला व त्यातून भौतिकशास्त्राची आपली समज अधिक वाढली.
कण भौतिकी, सूत्र सिद्धांत तसेच सापेक्षतावाद याबाबतची प्रारूपे समजून घेताना त्यांच्या संशोधनाचा उपयोग होतो. यापूर्वी २०१४ मध्ये मरयम मिर्झाखानी या फील्ड्स पदक प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला गणितज्ञ ठरल्या होत्या, त्यांचा वारसा उलेनबेक यांनी चालवला आहे. या पुरस्काराने गणितात संशोधन करण्याची प्रेरणा महिलांना मिळणार आहे.