ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाजीची मोठी परंपरा लाभली आहे. पण ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली यांच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा कोण वाहणार, याचे चोख उत्तर होते ते मिचेल जॉन्सन. वेग आणि स्विंग या दोन्ही आघाडय़ांवर जबाबदारी निभावणारा. फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणारा, त्यांच्यासाठी कर्दनकाळ असलेल्या जॉन्सनने निवृत्ती घेतली आणि जगभरातील फलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मिचेलला खरे तर टेनिसपटू व्हायचे होते. पीट सॅम्प्रसचा तो निस्सीम चाहता होता. टेनिसमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी तो क्वीन्सलॅण्डहून ब्रिस्बेनला रवाना झाला. पण टेनिसमध्ये मात्र त्याला कारकीर्द घडवता आली नाही. त्यानंतर त्याने क्रिकेटकडे मोर्चा वळवला. ऑस्ट्रेलियाचे माजी महान गोलंदाज डेनिस लिली यांनी त्याला हेरले आणि रॉड मार्श यांना त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट अकादमीमध्ये घेण्यास सांगितले. त्यानंतर १९ वर्षांखालील क्रिकेटपासून त्याने व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली. २००६च्या अ‍ॅशेस मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले असले तरी मालिकाभर तो बाकावरच बसून होता. अखेर ब्रिस्बेनलाच त्याला श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली. २००८ साली दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना त्याने आपल्या तालावर नाचवले. अवघ्या १२ धावांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
जॉन्सन फॉर्मात असला तर त्याचा सामना करायला नावाजलेले फलंदाजही घाबरायचे. कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये नैसर्गिक वेग होताच, पण चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यात हातोटी होती. २०१३-१४ च्या अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना त्याने पळताभुई थोडी करून ठेवली होती. विश्वचषकातील उपांत्य आणि अंतिम फेरीतील विजयाप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच विजयांमध्ये जॉन्सनचा वाटा होता. मग खेळपट्टी पाटा असली तरी.
जॉन्सन ज्या वेगाने हातात चेंडू घेऊन धावत यायचा, तेव्हाच फलंदाजाला धडकी भरायची. फलंदाजाच्या डोळ्यांत डोळे घालून खुन्नस देणाऱ्या, चेहऱ्यावर स्मित ठेवत फलंदाजाला शेलक्या शब्दांमध्ये सुनावणाऱ्या जॉन्सनकडे फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी प्रवृत्त करीत आपल्या जाळ्यात ओढण्याचे चातुर्य होते. फलंदाजांच्या यष्टीचा अंदाज घेताना त्याच्या मानसिकतेचाही अभ्यास जॉन्सन करीत होता. गोलंदाजाकडे जे अपवादात्मक गुण असायला हवे ते त्याच्यामध्ये ठासून भरले होते. आता तो मैदानात दिसणार नसल्याने फलंदाज आनंदात असले तरी सच्च्या क्रिकेट चाहत्याला त्याची उणीव नक्कीच जाणवेल.

Story img Loader