आफ्रिकेतील फुटबॉलपटूंनी गेल्या दोन दशकांत युरोपियन क्लब आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धामध्ये मोठय़ा प्रमाणात चमक दाखवण्यास सुरुवात केली आहे. पण यांतील बहुतेक पश्चिम आफ्रिकेतील होते नि आहेत. म्हणूनच, इजिप्तमध्ये जन्मलेला- वाढलेला मोहम्मद सलाह वेगळा ठरतो. या उत्तर आफ्रिकन फुटबॉलपटूला इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमधील व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या संघटनेने या वर्षीचा सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार बहाल केला. अशी करामत करणारा तो पहिला आफ्रिकन फुटबॉलपटू ठरला. त्याच्या अनेक निपुण पूर्वसुरींनाही ही मजल मारता आली नव्हती.
लिव्हरपूल क्लबकडून खेळताना मोहम्मद सलाहने यंदाच्या फुटबॉल हंगामात आतापर्यंत ४१ गोल झळकावलेले आहेत. यांत प्रत्यक्ष इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये झळकावलेल्या ३१ गोलांचा समावेश आहे. उर्वरित गोल युरोपियन स्पर्धेतील आहेत. विशेष म्हणजे अजूनही क्लब हंगाम संपलेला नाही. सलाहचा लिव्हरपूल संघ युरोपियन चॅम्पियन्स लीगमध्ये पुढील आठवडय़ात इटलीच्या रोमा क्लबशी भिडणार आहे. प्रीमियर लीगमध्येही काही सामने बाकी असून सलाहचा सध्याचा गोलधडाका पाहता ४१ गोलांमध्ये आणखी गोलांची भर सहज पडू शकते. इजिप्तमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळत असताना सलाहला युरोपियन फुटबॉल गुणवत्ता पारखींनी (टॅलेंट स्काऊट) हेरले आणि तो २०१० मध्ये बासेल या स्विस क्लबमध्ये आला. तिथे पहिल्याच हंगामात त्याच्या खेळाच्या जोरावर बासेलने स्विस लीगचे अजिंक्यपद पटकावले. २०१४ मध्ये त्याला पहिल्यांदा इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी चालून आली. चेल्सी क्लबने त्याच्यासाठी १.१० कोटी पौंड मोजले. पण त्या हंगामात त्याला बहुतेक सामन्यांमध्ये बेंचवर बसून राहावे लागले. पुढे फियोरेंटिना, रोमा या इटालियन क्लबकडून तो खेळला. मात्र गेल्या वर्षी लिव्हरपूलने त्याच्यासाठी ३.६९ कोटी पौंडांची विक्रमी रक्कम मोजली. क्लबचे प्रशिक्षक युर्गन क्लॉप आक्रमक व्यूहरचनेसाठी ओळखले जातात आणि सलाहच्या रूपात त्यांना हुकमी एक्का गवसला होता.
सुरुवातीला सलाह विंगैर म्हणून खेळायचा. लिव्हरपूलसाठी तो फॉरवर्ड म्हणून खेळू लागला. चपळ आणि चतुर असलेला सलाह विशेषत प्रतिहल्ल्यांमध्ये विलक्षण विध्वंसक ठरतो. पण त्याचा गोलधडाका हा स्वतसाठी नव्हे, तर संघासाठी असतो. त्यामुळेच लिव्हरपूल क्लबप्रमाणेच त्याचा इजिप्तचा राष्ट्रीय संघही यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला. कैरो विद्यापीठ परिसरात त्याच्या प्रत्येक सामन्याचा मोठय़ा स्क्रीनवरून आस्वाद घेण्यासाठी फुटबॉलप्रेमींची गर्दी होते. इजिप्तमधील गेल्या काही वर्षांतल्या अस्थिरतेच्या वातावरणात विरंगुळ्याचे काही क्षण कैरोवासीयांना सलाहनेच पुरवले.