भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरीही पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला गोवा हा प्रांत देशात समाविष्ट होण्यासाठी अनेकांना खरोखरीची तपश्चर्या करावी लागली. गोवा मुक्त झाल्यानंतर त्याच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम उभे करणाऱ्यांना मात्र केवळ सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून राहावे लागले. त्यांच्या शौर्याच्या कथा आता कोणाला ऐकायच्या नाहीत आणि त्यांचे कर्तृत्वही समजून घ्यायचे नाही. गोवा स्वातंत्र्यलढय़ातील बिनीचे शिलेदार असलेले मोहन रानडे यांचे निधन ही त्यामुळेच चटका लावून जाणारी घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्याच्या अखेरीपर्यंत मिळणाऱ्या सरकारी पेन्शनमधील मोठा वाटा दरमहा गरजू विद्यार्थ्यांना देणारे रानडे हे गेली काही वर्षे पुण्यात राहात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे दैवत. त्यामुळे गोवामुक्तीसाठी आझाद गोमांतक दलात सहभागी होणे अटळच होते. गोव्यात मराठीचे शिक्षक म्हणून काम करता करता, तेथील जनतेवर पोर्तुगीजांकडून होत असलेले अत्याचार ते डोळ्यांनी पाहात होते. परंतु तेव्हा दिल्लीत स्थापन झालेल्या स्वतंत्र भारताच्या सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळी संस्थाने खालसा झाली, पण वास्को द गामा याने १४९८ मध्ये गोव्यात पाऊल टाकले आणि त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाचा तेथील अंमल मोडून काढत १५१० मध्ये पोर्तुगीज सत्ता स्थापन झाली. अखेर गोव्याबाहेरील भारतीयांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला. गोवा, दमण आणि दीव या भागांवरील पोर्तुगीजांचे वर्चस्व लष्करी कारवाई करून सरकारला मोडून काढणे अजिबातच अशक्य नव्हते. या सशस्त्र लढय़ात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक, सुधीर फडके, सेनापती बापट यांच्यासारख्या अनेकांनी भाग घेतला. मोहन रानडे यांचा या लढय़ातील सहभाग रोमांचकारी होता, हे खरेच, परंतु त्यापायी १५ वर्षे पोर्तुगालमध्ये तुरुंगवास भोगूनही रानडे शेवटपर्यंत टवटवीत राहिले. याचे कारण आपल्या आयुष्याच्या आरंभीच ठरवलेले ध्येय पूर्ण झाल्याचा असीम आनंद त्यांच्या ठायी भरून राहिला होता. तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन कमालीच्या भयंकर संकटांना सामोरे जात जिवाचीही भीती न बाळगता हजारो भारतीयांनी हा लढा दिला. अखेरीस त्यात त्यांना यश आले.

रानडे यांनी मात्र आयुष्यात कधीही तक्रार केली नाही. जे केले, त्याचे भांडवल केले नाही आणि एवढे करूनही जे मिळाले नाही, त्यासाठी हट्ट केला नाही. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर काळातील एका रोमहर्षक लढय़ाचे नेतृत्व हरपले आहे.